विशेष प्रतिनिधी
नाशिक / येवला : येवल्यात एकाच दिवसात १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येवलेकरांची चिंता वाढली आहे. करोनाबाधित महिलेच्या कुटुंबातील सात जण पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील एका परिचरिकेचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकाने वाढ झाली होती.
नाशिक शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नरमधील ७५ वर्षीय महिला, गंगापूररोड परिसरातील डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळले आहे. तर देवळाली परिसरातील ७ पॉझिटिव्ह आले आहेत. यात शिंगवेबहुला, भगूर रोडवरील दोघांसह देवळलीतील सहा जवान आहेत. तर मालेगावातही ५६ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहे. नाशिक जिल्ह्यात ४७० रूग्णसंख्या झाली असून त्यात १५ जणांचा मृत्यू तर ३३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
येवल्यात ग्रामीण रुग्णालयाच्या दुसर्या एका परिचरिकेचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येवल्याचा करोना बाधितांचा आकडा ९ वर गेला होता. आज १६ रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करोना बधितांची संख्या २५ वर गेली आहे. यामुळे येवलेकर चांगलेच धास्तावले आहेत.
करोना बधितांच्या या वाढत्या संख्येने येवलेकरांची चिंता वाढवली आहे. येथील आरोग्य यंत्रणेतही करोनाचा शिरकाव झाल्याने येथील यंत्रणा हादरली आहे. नव्याने आलेल्या १६ पॉझिटिव्ह अहवालात उपजिल्हा रुग्णालयातील १० कर्मचार्यांच्या समावेश असून उर्वरीत एक रुग्ण पाटोद्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील, एक गवंडगाव येथील, एक कुक्कर गल्ली, एक म्हसोबा नगर, एक अंगणगाव तर एक लासलगाव येथील अशा १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या नवीन १६ अहवालात ९ पुरुष, एक ७ वर्षांचा मुलगा, तर ६ स्त्री रुगणांचा समावेश आहे.