- मालेगावात १६ रुग्णांची वाढ ; शहरातील रुग्ण संख्या २७४ वर
विशेष प्रतिनिधी
मालेगाव : शहरात करोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. २९ एप्रिल रोजी दिवसभरात ८२ रुग्ण वाढल्याने शहरातील रुग्ण संख्या २५० पार गेलीं होती. काल दि. ३० रोजी यात ५ रुग्णांची भर पडली होती. आज एकूण १२२ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून यात १६ रुग्ण बाधित मिळून आल्याने शहरातील रुग्ण संख्या २७४ इतकी झाली आहे.
मालेगाव शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दि.१ मे रोजी एकूण १२२ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले, यात १६ रुग्ण बाधित आढळले असून यात १२ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये ४ राज्य राखीव दलाचे जवान तर २ पोलीस कर्मचारी आहेत. शहरात गेल्या तीन दिवसात बंदोबस्तासाठी असलेल्या तब्बल ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या ४८ तासात ही संख्या दुप्पट झाली असून करोना बाधित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
…………………………………………………………………………………………………..
केंद्र शासनाच्या नव्या आदेशानुसार…
• रेड झोन : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, आणि मुंबई उपनगरे
• ऑरेंज झोन : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बुलढाणा, बीड
• ग्रीन झोन :
उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा
………………………………………………………………………………………………………….
शहरात करोनाचा शिरकाव होऊन तीन आठवडे झालेत. रुग्णसंख्या २७४ इतकी झाली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे करोना रक्षक म्हणून शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचारी व जवानांना देखील करोना लागण होत आहे. बंदोबस्त करत असताना या पोलीस कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले मात्र, त्यांना विलगीकरण करण्यात न आल्याने पोलीस दलात करोनाचा कम्युनिस्ट स्प्रेड सुरू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. मालेगाव शहरात राज्य राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. यातील जालना, औरंगाबाद हिंगोली येथील एकूण २८ जवानांना करोना लागण झाली आहे. तसेच शहरातील स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण मुख्यालय, आयेशानगर व आझाद नगर, कॅम्प आदी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे.