विशेष प्रतिनिधी
पुणे : गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वर येथे जाण्याची परवानगी देणारे पत्र दिल्याचे मान्य केले आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. हे पत्र देण्यासाठी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. सदर अहवाल सार्वजनिक केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे. या पार्श्वभूमीवर ’मानवतेची’ व्याख्याच बदलावी लागेल, असा टोला ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी लगावला आहे.
कुंभार यांनी सोशल मीडियात देशमुखांवर टीका करणारी पोस्ट लिहिली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी देशमुखांच्या विरोधात सडकून टीका केली आहे. लॉकडाऊमुळे अनेक सर्वसामान्य घरांमधल्या आई-लेकराची, पती-पत्नीची, भावाबहिणींची ताटातूट झाली आहे. एवढेच नव्हे तर गंभीर आजारपण, वृद्धत्व, एकाकीपणा याच्याशी लढणाऱ्या सर्वसामान्यांनाही सरकारी परवान्यांचा जाच होतो आहे. या स्थितीत राजकीय लागेबांधे असणाऱ्या आणि श्रीमंतांना मात्र लॉकडाऊनमध्येही विनासायास कुठूनही, कुठेही जाता येत असल्याची खंत नेटकऱ्यांनी केली आहे.
कुंभार यांनी उपहासपूर्ण शैलीत लिहीलं आहे – एक बरं झालं ‘ते’ पत्र देण्यासाठी ग़ुप्तांवर कोणताही राजकीय दबाव नव्हता हे अहवाल जाहिर होण्याआधीच समजलं. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री रवीना टंडन यांनी गुप्ता यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप खोटा ठरला. अमिताभ गुप्ता यांच्यावर आरोप झाल्या झाल्या टंडन ताईंनी ‘अमिताभ गुप्ता यांना बळीचा बकरा बनविण्यात येत आहे. ते पत्र देण्यासाठी दबाव आणला गेला आहे. वरिष्ठांनी आपल्या बोलवत्या धन्याला वाचवण्यासाठी ‘अशा गरीब’ माणसाचा बळी दिला आहे. गुप्ता यांचा इतिहास आणि निर्णय घ्या’ अशा अर्थाचे ट्वीट केले होते. गुप्ता यांचे बॉलिवूडशी असलेले संबध आणि त्यांचा पेज ३ पार्ट्यांमधील सहभाग हा नेहमीच चर्चेचा विषय होता. टंडनताईंच्या ट्वीटने त्याला दुजोरा मिळाला होता . असो.
सदर अहवालातून खालील प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करत कुंभार यांनी नेमके प्रश्न गृहखात्यासमोर उपस्थित केले आहेत. ते असे –
- वाधवान मंडळींनी खंडाळ्यावरून महाबळेश्वर ला जाण्यासाठी परवानगी कशी मागितली? (म्हणजे ई-मेल द्वारे , पत्र देऊन ) आणि ती कशी देण्यात आली?
- महाबळेश्वरला जाण्यासाठी या मंडळींनी कोणते कारण दिले होते?
- हे पत्र कुणाला उद्देशून लिहिले गेले होते ?.
- अशी परवानगी देण्यासाठी काय निकष आहेत?
- अशी परवानगी देण्यासाठी कुणी शिफारस केली होती का? असल्यास कुणी?
- या पत्रावर कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी काय काय कार्यवाही केली ? कुणाकुणाचा अभिप्राय घेतला ?
- ज्या लोकांना महाबळेश्वरला जायचं आहे त्यांची ओळख पटवण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे घेतली ?
- ही कागदपत्रे कुणी प्रमाणित केली.?
- अशी परवानगी कोणत्या कायद्याच्या कोणत्या नियमान्वये देण्यात आली ?
- अशी परवानगी देण्याचे अधिकार कुणाकुणाला आहेत.
- अशीच परवानगी लॉकडाउनच्या काळात आणखी किती लोकांना देण्यात आली?
- खंडाळा ते महाबळेश्वर या रस्त्यावर किती ठिकाणी वाधवान मंडळींना अडविण्यात आले व त्यांची तपासणी करण्यात आली?
- जिथे जिथे वाधवान मंडळींना अडवण्यात आले असेत तिथे त्यांच्याकडील परवान्याची वैधता संबधितांनी कशी तपासली?
- प्रत्येक गाडीत ५ लोक़ असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा भंग झाला असल्याने त्यांना का अडवण्यात आले नाही ?