विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याने काळजीत असाल तर चांगली बातमी आपल्या सर्वांसाठी आहे… ८ मेपर्यंत तब्बल १६५४० जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्तीचा हे प्रमाण जवळपास तिप्पटवर पोहोचले आहे. याशिवाय, २१६ जिल्ह्यांमध्ये अजिबात संसर्ग नाही, तर तब्बल १८३ जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये एकही रूग्ण सापडलेला नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. त्यानुसार, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण २९.३६ टक्के (१६५४० रूग्ण) आहे. एकीकडे मृत्यूदर (३.३टक्के) जगात कमी असतानाच भारताचा कोरोनामुक्तीचा हा दर जगात सर्वाधिक चांगला आहे. २१६ जिल्ह्यांत आजतागायत अजिबात संसर्ग नाही. ४२ जिल्ह्यांमध्ये २८ दिवसांपासून, २९ जिल्ह्यांत २१ दिवसांपासून, ३६ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांपासून आणि ४६ जिल्ह्यांमध्ये ७ दिवसांपासून एकही रूग्ण आढळलेला नाही. थोडक्यात जवळपास निम्मा भारत कोरोनामुक्त होत आहे.
दुसरीकडे चाचण्यांचा वेग वाढतच चाललेला आहे. ४५३ लॅबोरोटरीजच्या माध्यमातून आतापर्यंत १५ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेलेला आहे.
दरम्यान, अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन यासारख्या प्रगत देशांमध्ये झालेल्या विस्फोटाप्रमाणे भारतात तशी स्थिती उदभवणार नाही. मात्र, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याइतपत सज्जता झालेली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.