विशेष प्रतिनिधी
पुणे : तामिळनाडूमधील थेनी जिल्ह्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील 1 हजार 349 व्यक्तीना घेऊन मदुराईहून निघालेली ट्रेन सोमवारी रात्री उशिरा वर्धेत पोहोचली.
यात विदर्भातील 192 नागरिक होते. त्यांना रात्रीच एसटी महामंडळाच्या बसने त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यात आले. यामध्ये वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार आणि कामगारांचा समावेश आहे.
लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी, नोकरदार व कामगार इतर राज्यात अडकले आहेत. त्यांना राज्य सरकारच्या परवानगीने महाराष्ट्रात आणण्यात येत आहे. तामिळनाडू राज्यातील थेनी जिल्ह्यात पुणे विभागातील 302, नाशिक विभागातील 101, मराठवाडा विभागातील 754 तर विदर्भातील 192 लोक काम करत होते.
त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी 23 मे रोजी मदुराईतून श्रमिक ट्रेन 23 मे रोजी रात्री 10 वाजता निघाली. ही ट्रेन 25 च्या रात्री महाराष्ट्रात पोहोचली. पुणे, मनमाड, परभणी येथे या गाडीला थांबा देण्यात आला होता. नागरिकांना त्या-त्या थांब्यावर सोडत शेवटी ट्रेन वर्धा येथे पोहोचली. महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावरच आरोग्य पथकांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले.