विशेष प्रतिनिधी
पुणे : “सर्वसामान्य मुस्लीमांची असुरक्षितता वाढत असतांनाच, करोना ग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तबलिग जमातने ताबडतोब तोबानामा (माफीनामा) करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी,” अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येस तबलिग जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे, असे मुस्लीम सत्यशोधक मंडळाने म्हटले आहे.
तबलिगच्या वर्तनाचा समाचार घेत भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल, असा मजकूर सोशल मीडियात फिरत होता. त्यामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा खोट्या, बनावट पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच पोलीस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळे समाजाला अनामिक भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला, असे
मुस्लीम सत्यशोधक मंडळाने म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी “तबलिगला कसली ट्रिटमेंट देताय, त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे.” असे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मुस्लीमांची असुरक्षितता वाढत असतांनाच, करोना ग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तबलिग जमातने ताबडतोब तोबानामा करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी. अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केली आहे.
येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मस्जिद मध्ये नमाज आदा करतात आणि कबरस्थानात जावून प्रार्थना करीत असतात. पंधरा दिवसावर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लीम समाजात रमजानला फार महत्व असते. महिनाभर उपास, नमाज, कुरान पठण केले जाते. ईदगाहवर जावून सामुदायिक नमाज आदा करणे, आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट – अलिंगन दिले जाते. हे सर्व करोना विषाणु पसरवण्यात आणि करोना ग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
मानवतेसमोरील ह्या संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादीत ठेवावे. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळ सर्वांना करीत आहे, असे मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांनी स्पष्ट केले आहे.