विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तबलिगी जमातीच्या कारवायांबद्दल मीडियातून होणाऱ्या रिपोर्टिंगबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चिंता व्यक्त केली. या चिंतेविषयी मोदी यांनी पवार यांच्याशी सहमती व्यक्त केली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. पंतप्रधानांनी विडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसदेत किमान ५ खासदारांची संख्या असणाऱ्या राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांना या विडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीत निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे लोकसभेत ५ खासदार आहेत. या विडिओ कॉन्फरन्समध्ये पवार सहभागी झाले. मोदींशी बोलताना पवारांनी तबलिगी जमातीच्या कारवायांबद्दल मीडियातून होणाऱ्या रिपोर्टिंगचा गंभीर मुद्दा उपस्थित केला.
निजामुद्दीनच्या तबलिगी जमातीच्या मरकजमधून पोलिसी कारवाई करून २८ मार्चला सुमारे दीड हजार तबलिगींना बाहेर काढले. त्या दिवसापासून दररोज इलेक्ट्रॉनिक मीडियातून, प्रिंट मीडियातून, सोशल मीडियातून तबलिगी जमाती विषयीच्या बातम्या येत आहेत. तबलिगींच्या विविध कारवाया उघड होत आहेत. तबलिगीचा म्होरक्या महंमद साद फरार झाला आहे. तबलिगींमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ३५% वाढ झाली. तबलिगी जमातीचे लोक डॉक्टर, नर्सशी गैरवर्तणूक करतात. याबद्दल मीडियातून दररोज चर्चा होत आहेत. दररोज घडविल्या जाणाऱ्या या चर्चेमुळे देशातील वातावरण बिघडत आहे, अशी टीका पवार यांनी केली.
याच विषयावर पवार यांनी काल फेसबुक लाइव्ह करून दिल्लीतील कार्यक्रमाबद्दल योग्य ती काळजी घेतली असती तर मीडियाला विशिष्ट वर्गाबद्दल वातावरण कलूषित करण्याची संधी मिळाली नसती, असे मत व्यक्त केले होते. मीडियातून तबलिगी जमातीबद्दल रोजच चर्चा घडविण्याचे कारण काय, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला होता. तसेच सोशल मीडियावर आक्षेप घेत पवारांनी सोशल मीडियातील ५ पैकी ४ मेसेज खोटे असल्याचे नमूद केले. तेच मेसेज व्हायरल केले जातात, असाही आक्षेप त्यांनी नोंदविला होता.