विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत अद्याप कोरोनाच्या सामाजिक संक्रमणाच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला नाही, असे केंद्र सरकार म्हणत असले तरी तबलिगी जमातने मार्चच्या मध्य कालावधीत आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमातून पसरवलेला कोरोना हे सामाजिक संक्रमण नाही तर काय म्हणायचे…??, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. १३ ते १५ मार्च दरम्यान भारतात लॉकडाऊन नव्हते हे खरे पण जगात कोरोना केसेस वाढत होत्या. त्याच दरम्यान बंगलेवाली मशिदीत मरकज आयोजित करण्यात आला.
१९ देशांमधले लोक याच दरम्यान भारतात येत होते. भारतातले लोकही वेगवेगळ्या दिवसांमध्ये निजामुद्दीन परिसरात दाखल होत होते. या कार्यक्रमादरम्यानच भारतातील परिस्थिती गंभीर होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चपासून भारतभर लॉकडाऊन जाहीर केला त्याच वेळी आरोग्य मंत्रालयाने सोशल डिस्टंसिंगपासून विविध आरोग्य नियमावली जाहीर केली. पण बंगलेवाली मशिदीत या सर्व नियमावलीची आणि सोशल डिस्टंसिंगची पायमल्ली करण्यात आली. या परिसरात कोणत्याही आरोग्य नियमावलीचे पालन न करता १८०० लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये अनेकजणांना कोरोनाची लक्षणे आधीपासून होती, ती लपवण्यात आली. कार्यक्रमानंतर वेगवेगळ्या दिवशी येथील लोक देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेले.
तेथेही कोणती काळजी घेतल्याशिवाय सामूदायिक कार्यक्रमांमध्ये सामील झाले. यातून कोरोना सामाजिक संक्रमणापर्यंत पोहोचला. सरकारने इतरत्र संक्रमणाची दखल घेतली हे खरे पण निजामुद्दीन परिसरातून पसरणाऱ्या फैलावाची दखल घेण्यास उशीर झाला, ही वस्तुस्थिती आहे. काल याची दखल घेतली, तेव्हा १० जणांचा मृत्यू झाला होता. ३०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ९५० लोक संशयित रुग्ण आहेत.मरकजची माहिती दिल्ली प्रशासनाला आणि पोलिसांना देण्यात आली नव्हती
- बंगलेवाली मशिदीच्या मुख्यालयात राहणाऱ्या ३७ जणांना कोरोनाची लागण. त्यापैकी २४ जण रविवारी पॉझिटिव आढळले.
- या सर्वांनी मरकजमधील सर्वांसमवेत भोजन केले. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.
- धार्मिक कार्यक्रमांनंतरच्या वेळेत मरकजमधील अनेक लोक निजामुद्दीन परिसरात फिरत होते. बंगलेवाली मशीद ते ख्वाजा निजामुद्दीन औलिया दर्गा परिसरातील लोकसंख्या २५ हजार आहे.
- दिल्ली पोलिसांनी २२ मार्चनंतर बंगलेवाली मशिद परिसरात बाहेरून येणाऱ्यांवर बंदी घातली. पण तो पर्यंत मशीद परिसरात सुमारे १८०० जण पोहोचले होते. ते तेथे राहात होते. एकमेकांमध्ये मिसळतही होते. मशिद परिसराबाहेर पोलिसांचा पहारा होता पण मशिदीतील घडामोडींवर त्यांचे नियंत्रण नव्हते. तेथे सामाजिक संपर्क, एकत्र भोजन, कार्यक्रम सर्व सुरूच होते.