विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तबलिगी जमातीच्या धार्मिक गर्दीचे भयानक परिणाम मे महिन्याच्या सुरवातीला दिसायला लागतील. चीनी व्हायरस कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड लाखाला जाऊन धडकेल, असा धसकादायक निष्कर्ष आयआयएम, रोहतकच्या अभ्यासकांनी काढला आहे. आयआयएमचे संचालक धीरज शर्मा, डॉ. अमोल सिंह आणि डॉ. अभय पंत यांच्या टीमने हा अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. तबलिगींच्या धार्मिक गर्दीमुळे भारतातील कोरोनाग्रस्तांच्या प्रमाणात तिपटीने वाढ झाल्याचा निष्कर्ष देखील त्यांनी काढला आहे. गणितातील परागति अथवा प्रतिगमन मॉडेल वापरून वरील निष्कर्ष काढला आहे.
कोरोनाचा फैलाव गुणाकार पद्धतीने होतो. हा गुणाकार तबलिगींच्या धार्मिक गर्दीनंतर तिप्पट झाला. १४ एप्रिलला लॉकडाऊन उठविण्यात आले तर त्याही पेक्षा अधिक वेगाने तो फैलावेल आणि दिल्ली, मुंबईसारखे हॉटस्पॉट तयार करेल, असेही निष्कर्षात म्हटले आहे.
कोरोना फैलावाच्या गणिती अभ्यासाची आठ टेबल त्यांनी तयार केली आहेत. कोविड१९ च्या सरकारी वेबसाइटवरील तारीखवार डाटा यासाठी वापरून त्याचे गणिती विश्लेषण करण्यात आले आहे.
त्याच बरोबर राज्यवार विश्लेषण, आकडेवारी आणि भाकितही देण्यात आले आहे. या भाकिताची अचूकता ९३% पर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. उदा. तबलिगींच्या धार्मिक गर्दीनंतर एकट्या दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा चौपट वाढला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, राजस्थानात तो तिपटीने वाढला आहे. दिल्ली आणि मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा व्हायरल इन्फेक्शनमुळे वाढला आहे. तो वेगाने वाढू शकतो.
एप्रिल अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरवातीस आकड्यांमध्ये वेगाने वाढ झालेली दिसेल. देशभर कोणतेही मोठे समारंभ, गर्दीची ठिकाणी तयार करणे टाळले पाहिजे, असा इशाराही अभ्यासात देण्यात आला आहे.