विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोणताही पेशंट तपासणी शिवाय आणि उपचारा शिवाय ठेवण्यात येऊ नये, असे खासगी हॉस्पिटलनाही निर्देश जारी करा, असे पत्र केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पाठविले होते. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसू लागला आहे. संबंधित निर्देश राज्यातील सर्व हॉस्पिटलना २ मे पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
यापुढे कोविड 19 असलेल्या कोणतीही गंभीर लक्षणं नसलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करता येणार नाही. त्याच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठवणार, खाजगी, सरकारी रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला तपासलेच पाहिजे, रुग्ण पॉझिटिव्ह असेल तरच कोविड रुग्णालयात दाखल करावे.
थुंकीच्या नमुन्याचा अहवाल १२ तासांत मिळणे बंधनकारक असेल, १२ तासांच्या आत कोरोना रूग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी, अर्धा तासात रूग्णाचा मृतदेह वॉर्डाबाहेर काढावा हे सर्व निर्णय २ मेच्या सकाळी १० पासून लागू करण्यात येतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.