विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोविड १९ च्या प्रभावी प्रतिकारासाठी सरकारने टेलिमेडिसीनसाठी मार्गदर्शक सूची जारी केली असून देशातील दुर्गम भागापासून सर्वत्र परिणामकारक उपचारांसाठी त्याचा उपयोग होईल, असे म्हटले आहे. टेलिफोनवरून रुग्णाशी संवाद साधून त्याला उपचारसूची देण्यापासून रिमोट सेन्सिंग उपकरणांद्वारे त्याचावर थेट उपचार करण्यापर्यंत व्याप्ती या टेलिमेडिसीन मार्गदर्शक सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नव्या तंत्राद्वारे रुग्णाचा आवाज, शारीरिक अवस्थेचा डाटा, छायाचित्रे, वीडिओ ही डॉक्टरपर्यंत पोचून त्याचे तत्काळ अँनँलिसीस करून रुग्णावर उपचार सुरू करण्याचे निर्देशही यात आहेत. काही उपकरणे आणि सुविधा यासाठी सरकार तातडीने वाढविणार आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि नीती आयोगाने मेडिकल प्रोटोकॉल, धोरणे आणि प्रक्रिया तसेच वैद्यकीय निकष पाळून ही मार्गदर्शक सूची तयार केली आहे. डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तसेच ईशान्य भारतात कोविड १९ पोचला आहे यांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल आहे. डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ यांना संक्रमणाद्वारे कोविड १९ ची लागण होण्याचा धोका यातून टाळता येईल.