विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात डॉक्टरांची क्षमता आणि निपुणता यांच्या बळावर पोलिओ निर्मुलन झाले. याच कोरोना योध्यांच्या मदतीने चीनी व्हायरसविरुध्दचा लढा जिंकणारच असा आशावाद केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात करण्यात येणाऱ्या उपाय योजनाबाबत, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारांच्या आरोग्य अधिकाºयांसोबत डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा केली.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, पोलिओ आणि देवी या रोगांचे निर्मुलन केले त्याप्रमाणे या विषाणूचा नायनाट करण्यासाठी आपणा सवार्ना एकत्र काम करावे लागेल. आपण या विषाणूवर विजय मिळवू शकतो आणि आपण नक्कीच विजयी ठरू असा विश्वास हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला. कोविड विरुध्द क्षेत्रीय स्तरावर अधिक उपाय योजना करण्यावर चर्चा झाली.
आपले कोरोना योद्धे कळकळीने सेवा करत असल्यामुळे जगाच्या इतर भागांपेक्षा भारतात स्थिती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तज्ज्ञांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांचा स्वीकार करत आहेत. यामुळे कोविड-19 ला आपण आटोक्यात ठेवू शकत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना योध्यांची मानवतेची सेवा करण्याची वृत्ती आणि आशादायी दृष्टीकोन यांची त्यांनी प्रशंसा केली.
चीनी व्हायरस विरुध्दच्या लढ्यात भारत आपल्या दृढ कटीबद्धतेचे दर्शन घडवत आहे असे सांगून भारताच्या उपायांची जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ पूनम खेत्रपाल यांनी भारताचे कौतुक केले. हॉट स्पॉट आणि दाटीवाटीच्या भागात सूक्ष्म आराखडा विकसित करणे, कोणत्या मार्गांनी प्रसार होऊ शकतो हे निश्चित करण्यासाठी, सध्याच्या रुग्णाबाबत विश्लेषण करण्यासाठी मदत करणे, जिल्ह्यामधे देखरेख ठेवण्याचे धोरण तयार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन जागतिक आरोग्य संघटनेने दिली.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या तीन राज्यातले अनुभव आणि रणनीती या बैठकीत सादर करण्यात आली. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे संचालक, आरोग्य सचिव यांच्यासह जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक आणि इतर अधिकारी वर्ग बैठकीला उपस्थित होता.