दाट लोकवस्तीत चीनी व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आयुर्वेदावर आधारित रोग प्रतिबंधक औषधाचा वापर करण्यासाठी अभ्यासाचा प्रारंभ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी केला. अश्वगंधा, यष्टीमधु, गुडूची आणि पिपळी यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दाट लोकवस्तीत चीनी व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आयुर्वेदावर आधारित रोग प्रतिबंधक औषधाचा वापर करण्यासाठी अभ्यासाचा प्रारंभ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी केला. प्रतिबंधात्मक क्षमतेचे आणि अति धोका असलेल्या भागात जीवनमान सुधारण्यासाठी मुल्यांकन करणे हा याचा मुख्य हेतू आहे. अश्वगंधा, यष्टीमधु, गुडूची आणि पिपळी यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
डॉ हर्ष वर्धन यांनी नवी दिल्लीत आयुष संजीवनी अॅपचे आणि कोविड-19 परिस्थितीशी संबंधित आयुष आधारित दोन अभ्यासांचा प्रारंभ केला. आयुष राज्य मंत्री श्रीपाद नाईक गोव्याहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. ‘आयुष संजीवनी’ अॅपमुळे कोविड-19 ला प्रतिबंध घालण्यासाठी त्याचा प्रभाव याविषयी माहिती उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
आयुष, इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे ऐप विकसित केले असून 50 लाख लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय तसेच सीएसआयआर, आयसीएमआर यासारख्या तंत्रज्ञान संस्था आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांना एकत्र आणण्यासाठी संयुक्त व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या संस्था एकत्र येऊन आयुर्वेदाच्या प्राचीन औषध विषयक ज्ञानामुळे आरोग्याला होणाऱ्या मदतीचा प्रसार करत आहेत.
डॉ हर्ष वर्धन यांनी दोन अभ्यास सुरु केले. एकात कोविड-19 साठी घ्यायची काळजी आणि रोगप्रतिबंधक औषध यासाठी आयुर्वेदाचे सहाय्य याविषयी संयुक्त वैद्यकीय संशोधन अभ्यास आहे. आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, सीएसआयआर द्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी आयसीएमआरचे तांत्रिक सहकार्यही लाभणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष आणि डॉ भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखालच्या आंतरशाखा आयुष संशोधन आणि विकास कृती दलाने देशातल्या विविध संस्थांच्या तज्ञांशी चर्चा करून आणि आढावा घेऊन अभ्यासक्रमासाठी आराखडा निश्चित केला आहे. कोविड-19 महामारीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिबंधक म्हणून अश्वगंधाचा वापर केला जाणार आहे.