चिनी विषाणूविरुद्धच्या लढाईत देशातील ऑर्डिनन्स फॅक्टरीही उतरल्या आहेत. विविध वैद्यकीय सामुग्री तयार करणे त्यांनी सुरू केले आहे. यात व्हेंटिलेटरसह सॅनीटायझर, मास्क, वैयक्तिक सुरक्षा साधने यांचा समावेश आहे. त्यचाबरोबर या ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी विलगीकरण कक्षही उभारण्यात येत आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चिनी विषाणूविरुद्धच्या लढाईत देशातील ऑर्डिनन्स फॅक्टरीही उतरल्या आहेत. विविध वैद्यकीय सामुग्री तयार करणे त्यांनी सुरू केले आहे. यात व्हेंटिलेटरसह सॅनीटायझर, मास्क, वैयक्तिक सुरक्षा साधने यांचा समावेश आहे. त्यचाबरोबर या ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी विलगीकरण कक्षही उभारण्यात येत आहेत.
ऑर्डिनन्स फॅक्टरी संचालनाच्या कारखान्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसारच्या हँड सॅनिटायझरचे उत्पादन घेतले जात आहे. मध्यप्रदेशातील इटारसी आणि महाराष्ट्रातील भंडारा या दोन्ही कारखान्यांमध्ये हे उत्पादन सुरू आहे. त्यांची उत्पादनक्षमता दर दिवशी 3 हजार लिटर सॅनिटायझर एवढी आहे. त्यानुसार देशातील सॅनिटायझरची मागणी दोन्ही कारखाने मिळून पूर्ण करु शकतील.
कानपूर, शहाजहानपूर, हजरतपूर (फिरोजाबाद) आणि चेन्नई येथील कारखाने संपूर्ण शरीरासाठीचे संरक्षक आवरण आणि फक्त तोंड झाकण्यासाठीचे मास्क यांचे उत्पादन करत आहेत. ग्वाल्हेरच्या संरक्षक संशोधन आणि विकास संस्थेला कारखाने संचालक मंडळाने केलेल्या विनंतीवरून शरीरसंरक्षक आवरण तयार केले आहे. आठवड्याला 5 हजार ते 6 हजार नग एवढे उत्पादन सुरू करणार आहे.
भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुढिल दोन महिन्यात 30 हजार व्हेंटिलेटर्सचे उत्पादन घेण्याची विनंती केली आहे. त्यानुसार भारत इलेक्ट्रॉनिक्सने हे आवाहन स्वीकारले आहे. मेदकच्या कारखान्याने हैद्राबादच्या विविध ठिकाणच्या रुग्णालयातील जीव संरक्षण प्रणाली (व्हेंटिलेटर्स)च्या दुरुस्तीची जबाबदारी स्विकारली आहे. देशाच्या सहा राज्यातील दहा रुग्णालयांमध्ये 280 विलगीकरण कक्ष उभारण्याची ऑर्डिनन्स फॅक्टरी संचालक मंडळाची (योजना आहे. जबलपूरचा वेईकल कारखाना, पश्चिम बंगालमधील इशापुरचा धातू व स्टील कारखाना तसेच कोसीपोरमधील पिस्तूल आणि उखळी तोफांचा कारखाना, महाराष्ट्रातील खडकी येथील दारुगोळा कारखाना, उत्तर प्रदेशातल्या कानपूर, तामिळनाडूतला अवादी येथील अवजड वाहन कारखाना आणि तेलंगणातल्या मेदक येथील कारखाना आदी 10 ठिकाणी या वैद्यकीय सोयी करण्यात येतील.