विशेष प्रतिनिधी
पुणे : चीनी विषाणूनेे आपल्याला गाठले या भीतीमधून गुरुवारी रात्री लाईट गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ‘त्या’ तरुणाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तत्पूर्वी संशयित कोरोना रुग्ण म्हणून त्याची चाचणी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात त्याच्या तपासणीचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला.
मात्र केवळ घाबरुन या तरुणाने स्वतःचा घात केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. खडकीत राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला सर्दी-खोकला-ताप होता. तो दवाखान्यात तपासणीकरिता गेला. तिथे त्याच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर त्याला श्वसनास त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला बोपोडीच्या रुग्णालयात विलगिकरण कक्षात ठेवले गेले होते.
त्याच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी येणार होता. त्या आधीच “आपल्याला ‘कोरोना’ने गाठले, आता आपण वाचत नाही,” अशी भीती त्याच्या मनात बसली. त्यातून तो दिवसभर अस्वस्थ झाला होता. अनेकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पावसामुळे वीज गेली. त्या अंधाराचा फायदा घेत त्याने रात्री साडेनऊच्या सुमारास रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
दरम्यान, या तरुणाच्या स्वाब तपासणीचा रिपोर्ट शुक्रवारी रात्री उशिरा महापालिकेच्या आरोग्य विभागास प्राप्त झाला. हा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. हे समजल्यावर रुग्णालयातील अन्य रुग्ण आणि त्या तरुणावर उपचार करणार्या अन्य डॉक्टरांच्या मनात कालवाकालव झाली. कोरोना हा जीवघेणा आजार नसून त्यातून लोक बरे होतात, हा विश्वास वैद्यकीय तज्ञ देत असतानाच दुसरीकडे नागरिक मात्र या आजाराबाबत भीती बाळगून आहेत.
“संबंधित तरुणाने भीतीपोटी आत्महत्या केली. त्याने तपासणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा केली असती तरी त्याचा जीव वाचला असता. चीनी विषाणूवर मात करता येते, हा जीवघेणा आजार नाही. काही लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत,” असे आवाहन पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी केले.