विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चिनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 130 कोटी लोकसंख्येचा देश लॉकडाऊनमध्ये गेल्याचा जोरदार फटका भारताला बसण्याची चिन्हे आहेत. देशातले महत्त्वाचे उद्योग, कारखाने बंद आहेत. विमानसेवा, रेल्वे सेवा स्थगित आहे. गेल्या महिन्यात 22 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युचे आवाहन केले. त्यानंतर 25 मार्चला देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा झाली. काही राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. या प्रक्रियेत भारताच्या अर्थव्यवस्थेला साात ते आठ लाख कोटींचा फटका बसला असण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
इकॉनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे 70 टक्के आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या. गुंतवणूक, निर्यात थांबली. तसेच स्थानिक खपावरही विपरीत परिणाम झाला. केवळ अत्यावश्यक सेवा आणि मालाची वाहतूक-विक्री चालू आहे. यामध्ये शेतमाल विक्री, बॅंकींग, खाणकाम, आयटी, वीज, पाणी सेवा आदींचा समावेश आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चच्या मते, चिनी विषाणूचे संकट भारतावर अत्यंत चुकीच्या वेळी कोसळले. काही ठोस उपायांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने गती पकडण्यास सुरुवात केली होती, मात्र त्याचवेळी चिनी विषाणूचा उद्रेक झाला.
अँक्युट रेटिंग्ज अँड रिसर्चने या महिन्याच्या सुरुवातीलाच अंदाज बांधला होता की, लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे दररोजचे नुकसान 35 हजार कोटींहून अधिक असेल. यामुळे सकल उत्पादनातली (जीडीपी) घट ही सुमारे साडेसात लाख कोटींची असेल. चिनी विषाणुच्या वेगाने होणाऱ्या प्रसारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जोरदार हादरा बसला आहे. परिणामी भारतातल्या उद्योगसमुहांनी 25 मार्चपासूनच पूर्ण शटडाऊन चालू केले होते. क्रेडीट रेटिंग करणाऱ्या या संस्थेच्या मते, 15 एप्रिलनंतर देशव्यापी लॉकडाऊन मागे घेतला जाण्याचे नियोजन आहे. मात्र अर्थव्यवस्थेतील अडथळे किती चिंताजनक हे चिनी विषाणूच्या उद्रेकाची व्यापकता किती, यावर ठरणार आहेत. वाहतूक, हॉटेल, बांधकाम व्यवसाय या क्षेत्रांना बसलेला फटका सर्वात मोठा आहे.
मंगळवारी (ता. 14) सकाळी देशाला उद्देशून केल्या जाणाऱ्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊननंतरच्या परिस्थितीवर भाष्य करण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी)चे सचिव नवीन गुप्ता यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये मालमोटार मालकांना दररोज प्रत्येक मालमोटारीमागे दररोज बावीसशे रुपयांचे नुकसान होत आहे. पंधरा दिवसांचे हे नुकसान 35 हजार 200 कोटी रुपयांच्या घरात जाते. देशभरात सुमारे एक कोटी मालमोटारी आहेत. यातल्या 90 टक्के सध्या बंद आहेत. केवळ आवश्यक सेवांशी निगडीत मालमोटारी रस्त्यावरुन धावत आहेत. लॉकडाऊन मागे घेतल्यानंतरसुद्धा परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान 2-3 महिने लागतील.
नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल या बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या मते, बांधकाम क्षेत्राचे झालेले नुकसान 1 लाख कोटींच्या घरात आहे. संघटनेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी म्हणाले की, नुकसानीचा अंदाज काढणेसुद्धा भीतीदायक वाटते. अगदी किमान आकडा काढला तरी तो 1 लाख कोटींपर्यंत जातो. रिटेल व्यापाराशी संबंधित असणाऱ्या द कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या मते रिटेल व्यावसायिकांचे नुकसान 30 अब्ज डॉलर्स आहे. रिटेल क्षेत्रात 7 कोटी लहान-मोठे व्यापारी कार्यरत आहेत. या क्षेत्राने 45 कोटी रोजगार निर्माण केलेले आहेत. या उद्योगाची सरासरी मासिक उलाढाल 70 अब्ज डॉलर्स आहे.
जागतिक बॅंकेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिलला सुरु झालेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था दीड ते 2.8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सन 1991 मध्ये भारताने स्विकारलेल्या आर्थिक सुधारणांच्या नंतरची ही सर्वात निचांकी वाढ असेल. एशियन डेव्हलपमेंट बॅेकेच्या मते भारताचा विकासदर 4 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल. तर एस अँड पी ग्लोबल रेटिंगच्या मते हा विकास दर 3.5 टक्क्यांवर येईल.