दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे वाधवान कुटुंबिय लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचले. या कुटुंबातल्या 23 जणांना प्रवासादरम्यान कुठेही अडवू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या गेल्या. येस बॅँक घोटाळ्यातही सहभाग असलेल्या वाधवान कुटुंबियांवर महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याची इतकी मर्जी आहे, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : रस्त्यावर महत्वाच्या कामासाठी येणाऱ्यांचा समाचार घेण्यासाठी पोलीसांनी लाठीला तेल पाजून ठेवावे, असे सांगणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच गृहविभागाच्या विशेष सचिवांच्या पत्रावर दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे वाधवान कुटुंबिय लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचले. या कुटुंबातल्या 23 जणांना प्रवासादरम्यान कुठेही अडवू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या गेल्या. येस बॅँक घोटाळ्यातही सहभाग असलेल्या वाधवान कुटुंबियांवर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याची इतकी मर्जी आहे, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.
देश लॉकडाऊन असताना महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबाला तिथे जाण्याची परवानगी कशी मिळाली, याची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. वाधवान बंधूंना आणि कुटुंबाला देशात संचारबंदी लागू असताना महाबळेश्वरला प्रवास करण्यासाठी विशेष पास किंवा परवानगी मिळाली. महाबळेश्वरला जाताना त्यांच्य गाड्यांचा ताफा कुठेच कसा अडवला गेला नाही. शिवाय ते डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील जामीनावर असलेले आरोपी आहेत. त्यामुळे यासर्व प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती किरीट सोमय्या यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख यांच्याकडे आहे. देशमुख हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दाबाहेर नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणात संशयाची सुई पवारांकडे जाते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
न्यायालयाने दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे (डीएचएफएल) प्रवर्तक कपिल वाधवान यांना कुख्यात गँगस्टर इक्बाल मिरचीशी असलेल्या आर्थिक संबंध प्रकरणात २१ फेब्रुवारीला जामीन मंजूर केला होता. वाधवान यांना 27 जानेवारीला सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत करण्यात आली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग कायद्यासाठीच्या विशेष न्यायालयाने वाधवान यांना ईडीची कोठडी सुनावली होती. वाधवान यांना अंडरवर्ल्ड गँगस्टर इक्बाल मिरची याच्याशी असलेल्या मनी लॉंडरिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.
दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे (डीएचएफएल) प्रवर्तक कपिल वाधवान यांची भारत आणि भारताबाहेर 3 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाली आहे. वाधवान यांनी ही मालमत्ता डीएचएफएलकडून मनी लॉंडरिंगद्वारे पैसे इतरत्र वळवत विकत घेतल्याचा आणि त्यासाठी हवाला रॅकेटचा वापर केल्याचा संशय ईडीला आहे