वृत्तसंस्था
लखनौ : देशभरातून स्पेशल ट्रेनने उत्तरप्रदेेशात परतणाऱ्या स्थलांतरीत मजूरांच्या प्रवासाचे भाडे सरकारतर्फे देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे.
चिनी विषाणूच्या जागतिक साथीमुळे जगभरचे अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात रोजगारधंद्यासाठी गेलेल्या उत्तरप्रदेशातील मजुरांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना रोजगार नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने स्थलांतरीत मजूर घरी परतत आहेत. या मजुरांसाठी केंद्र सरकारने विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.
उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या विनंतीवरुन सोडल्या जाणाऱ्या रेल्वेतून परतणाऱ्या मजुरांकडून भाडे वसूल करू नये, अशी सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यानुसार या मजुरांकडून भाड्याचे पैसे घेतले जाणार नाहीत. त्यासाठी रेल्वेला आगाऊ तिकीड भाडे राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.
दुचाकीवरुन किंवा चालत कोणीही मजुर उत्तरप्रदेशात घरी परतता कामा नये, या दृष्टीने नियोजन करण्याची ताकीद योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार विविध राज्यांमधून येणाऱ्या मजुरांच्या संख्येची माहिती गोळा केली जात आहे. या सर्वांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे कामे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, असेही अवस्थी यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय चाचणी करुन आलेल्या मजुरांना त्यांच्या घरी सोडले जात आहे. त्यांना अन्नासाठी शिधाही दिला जात आहे, असे ते म्हणाले.
गुरुवारपर्यंत उत्तरप्रदेशात 318 विशेष रेल्वे आल्या असून यातून देशभरातले 3.84 लाख मजुर राज्यात परतले आहेत. याशिवाय 72 हजार 637 मजूर आणि विद्यार्थी बसगाड्यांमधून उत्तर प्रदेशात आणण्यात आले आहेत, असे अवस्थी यांनी सांगितले.