देशातील चीनी व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसारखे प्रभावी पाऊल उचलण्याबरोबरच काश्मीरमधून ३७० कलम हटविणे, नागरिकत्व संशोधन विधेयक कर्तारपूर कॉरीडॉर उघडणे ही मोठी कामगिरी असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील चीनी व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसारखे प्रभावी पाऊल उचलण्याबरोबरच काश्मीरमधून ३७० कलम हटविणे, नागरिकत्व संशोधन विधेयक कर्तारपूर कॉरीडॉर उघडणे ही मोठी कामगिरी असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
मोदी सरकार – २ च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त गृह मंत्रालयाने आपल्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. आठ पानी पुस्तिकेत गृह मंत्रालयाने आपली कामगिरी सांगितली आहे. यामध्ये काश्मीरमधून ३७० कलम हटविणे, नागरिकत्व संशोधन विधेयक कर्तारपूर कॉरीडॉर उघडणे याचबरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणेला परदेशात चौकशीचे अधिकार मिळणे हे देखील चांगले याश मानले आहे.
याशिवाय दहशतवाद्यांचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर, हाफिझ सईद, जकीऊर रेहमान लकवी आणि दाऊद इब्राहिम यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात गृह मंत्रालयाची मोठी भूमिका राहिली.
अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मितीही गृह मंत्रालयाच्या प्रयत्नातूनच झाली. नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या माध्यमातून अफगाणिस्थान, पाकिस्तान आणि बांग्ला देशात राहणाऱ्या सहा अल्पसंख्यांक समुहांना भारतातील नागरिकत्वाचा अधिकार मिळणे शक्य झाले आहे.
देशातील चीनी व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून उचलल्या गेलेल्या पावलांनाही महत्वाचे म्हटले आहे. १४ मार्चला याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. त्यामुळे राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत मिळणे शक्य झाले. त्यानंतर २५ मार्चला पहिला लॉकडाऊन घोषित करण्यात आला.
देशात चार टप्यांत प्रभावी पध्दतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली. यासाठी राज्यांशी समन्वय साधण्यात आला. गृह मंत्रालयाने विविध गाईडलाईन्सच्या माध्यमातून राज्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर देशात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राखण्यात आला. हे देखील एक यश मानण्यात आले आहे.