विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाविरूद्धच्या लढाईत केंद्र व राज्य सरकारांचे हात बळकट करण्यासाठी भाजपने आपली अवाढव्य संघटनात्मक ताकत लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. भाजपच्या एक कोटी कार्यकर्त्यांनी दररोज पाच कोटी फूड पॅकेट्स गरीबांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांच्या पुढाकारातून हा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचा वेगवान संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशव्यापी लाकडाऊनची घोषणा केली आहे. सुमारे १३० कोटींचा हा देश २१ दिवसांसाठी घरामध्ये बंदिस्त राहणार आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचाच पुरवठा चालू राहणार आहे. अशास्थितीत हातावर पोट असलेल्या, स्वतःचे छत नसलेल्या गरीबांबाबतचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या संदर्भात केंद्र सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. एक म्हणजे, गहू व तांदूळ अनुक्रमे दोन व तीन रूपयांना उपलब्ध करून देणे. या निर्णयाचा लाभ सुमारे ऐंशी कोटी जनतेला होईल. दुसरा निर्णय आहे, तो म्हणजे कोरोनाच्या सर्व चाचण्या व उपचारांचा खर्च आयुष्मान भारत योजनेतून करण्याचा. याशिवाय अनेक राज्य सरकारे आपापल्या पातळ्यावर अनेक जनतापयोगी निर्णय घेतच आहेत. उदाहरणार्थ, योगी आदित्यनाथ सरकार व जम्मू काश्मीर सरकार गरीबांना एक हजार रूपये देणार आहे, छत्तीसगढ सरकारनेही तीन महिन्यांचे अन्नधान्य मोफत देणार आहे. तरीसुद्धा दारिद्रयरेषेखालील मोठी संख्या लक्षात घेता, गरीबांची ससेहोलपट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गृहीत धरून भाजपने आपली अवाढव्य संघटनात्मक ताकतीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपची सदस्य संख्या सुमारे १४ कोटींच्या आसपास आहे. त्यापैकी एक कोटी सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यात बूथ समित्या, शक्तिकेंद्रे प्रमुखांचा समावेश होता. बुधवारी सायंकाळी नड्डा यांनी राष्ट्रीय पदाधिकारयांची ‘स्काइप’च्या माध्यमातून व्हिडीओ बैठक घेतली. तत्पूर्वी ते एक लाख कार्यकर्त्यांशी व्हिडीओ संवाद केला होता. राष्ट्रीय पदाधिकारयांबरोबरील बैठकीमध्ये अनेक सूचनांचा विचार झाला. गरीबांच्या जेवणाची सोय हा सर्वांत महत्वाचा मुद्दा असल्याचे समोर आले. याशिवाय रक्तदानासारख्या गरजेच्या बाबींवरही चर्चा झाला. त्यातून मग एक कोटी कार्यकर्त्यांनी दररोज पाच फूड पॅकेट्स तयार केली तर दररोज पाच कोटी लोकांच्या भोजनाची व्यवस्था होऊ शकते, असा विचार आला. ही फूड पॅकेट्स स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमांतून पोहोचविण्याबाबतही चर्चा झाली. दोन दिवसांत या योजनेला मूर्त स्वरूप देण्यात येईल. तत्पूर्वी अनेक स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्थाने, सामाजिक क्षेत्राबद्दल संवेदनशील असलेली उद्योग घराणी यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोदी हे दोन-तीन दिवसांमध्ये स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधणार आहेत.
BJP is putting in place a mechanism to link up community kitchens, which can serve atleast 1000 per day, so that we can ensure food to the urban poor, migrant workers and construction labourers, daily wage earners and those in the unorganised sector. Join. https://t.co/FzhgZ0YR5T
— BJP (@BJP4India) March 26, 2020
नड्डा यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र :
- घरांमध्येच रहा. ‘सोशल डिस्टन्सिंग’, स्वच्छता या संदर्भात सरकारचे आदेश पाळा.
- पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, ९ गरीब परिवारांना आर्थिक मदत करा.
- २१ दिवस घरांमध्ये बंद राहण्याच्या कल्पनेने आपल्या आजूबाजूचे लोक सैरभैर होऊ शकतात. त्यांना धीर द्या, संकटावर मात करण्यासाठी लाकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे पटवून द्या.
- वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
- पोलिस, डाॅक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवांमध्ये स्वतःला झोकून देणारया मंडळींना समाजातून भेदभावाची वागणूक अथवा त्यांना हिडीसफीडिस केले जाणार नाही, यासाठी प्रयत्न करा. ते खरे हिरो असल्याचे समाजाला पटवून द्या.
- लाॅकडाऊन कालावधीमध्ये प्रेरणादायी गोष्टींची चर्चा करा,योग करा, नवे काही तरी शिका आणि त्याचा समाजासाठी वापर करा.
- स्थानिक प्रशासनाने विनंती केल्यास त्यांना आरोग्यविषयक नियम पाळून सहकार्य करा.