विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी ‘लोकल ते ग्लोबल’ अशी घोषणा केली होती. स्थानिक उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्याद्वारे करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या आवाहनास खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता खादी आणि रेशमी कापडापासून तयार करण्यात आलेले खास भारतीय मास्क आता अमेरिका, युरोप, पश्चिम आशियासह जगभरात निर्यात केले जाणार आहेत.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे नॉन मेडिकल, नॉन सर्जिकल मास्कवरील निर्यातीचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे खादीतर्फे तयार करण्यात आलेल्या खादी व रेशमी कापडाच्या मास्कची जगभरात निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्याविषयी बोलताना खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना म्हणाले, खादी मास्कची जगभरात निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या ‘लोकल ते ग्लोबल’चे हे सर्वोत्तम उदाहरण ठरणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या आवाहनामुळे गेल्या काही वर्षात खादीची वस्त्रे व अन्य उत्पादनांची लोकप्रियता जगभरात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
त्यामुळे जगभरातील देश खादी मास्कलाही पसंती देतील, यात कोणतीही शंका नाही. खादी आणि रेशमी कापडापासून तयार करण्यात आलेले हे मास्क गुणवत्तेच्या कसोटीवर उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा धुवून वारंवार वापर करणे शक्य आहे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे ते बायो-डिग्रेडेबलही आहेत. यामुळे देशाच्या ग्रामीण भागात पसरलेल्या कारागिरांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळणार आहे, असेही सक्सेना म्हणाले.
निर्यातीवरील निर्बंध दूर झाल्याने आता आयोगातर्फे अमेरिका, युरोप, पश्चिम आशियातील देश, दुबई, मॉरिशस या देशांमध्ये मास्कची निर्यात करणार आहे. या देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खादीच्या उत्पादनांनी मोठी लोकप्रियता मिळविली आहे. या देशांमध्ये मास्कविक्री करण्यासाठी तेथील भारतीय दूतावासांची मदत घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे संपूर्ण जग विश्वासाने पाहत आहे, त्यामुळे खादी मास्कमुळे त्यांचा विश्वास अधिकच वाढणार आहे. मास्क तयार करताना विशेष प्रकारच्या डबल ट्विस्टेड खादीच्या कापडाचा वापर करण्यात आला आहे.
त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हातमागावरील खादी आणि रेशमी कापडाचा वापर होत असल्याने नैसर्गिक अवरोधक म्हणूनही मास्क काम करतात. त्याचप्रमाणे हे मास्क धुतल्यानंतर वारंवार वापरणेही शक्य आहे. तसेच हवा खेळती राहत असल्याने अन्य मास्कचा वापर करताना होणारा स्वासोच्छवासाचाही त्रास होणार नाही. विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे मास्क महिला आणि पुरुष या दोघांनाही वापरता येणार आहेत.
आतापर्यंत आयोगाकडे ८ लाख मास्कची देशांतर्गत मागणी नोंदविण्यात आली असून त्यापैकी ६ लाख मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे कार्यालय, केंद्र सरकारची मंत्रालये, जम्मू – काश्मीर सरकारसह सर्वसामान्य नागरिकांनीही ऑनलाईन पध्दतीने मागणी नोंदविली आहे. त्याचप्रमाणे देशभरातील खादी संस्थांद्वारे आतापर्यंत सुमारे साडेसात मास्कचे विनामूल्य वाटपही करण्यात आले आहे.