भारताविरोधात करत असलेला दहशतवाद थांबवा आणि तो पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी वापरा, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याला फटकारले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताविरोधात करत असलेला दहशतवाद थांबवा आणि तो पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी वापरा, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याला फटकारले आहे.
पाकिस्तानमध्ये चीनी व्हायरसमुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही या रोगाचा उद्रेक आहे. त्यामुळे निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने खेळवावेत, अशी मागणी माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती. त्यावर, आम्हाला असल्या मार्गाने पैशाची गरज नाही असे कपील देव म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कपील देव म्हणाले,
सध्या मी दूरचा विचार करत आहे. नजीकच्या भविष्यकाळाचा विचार करता तुम्हाला खरंच असं वाटतं का की सध्या चर्चा करण्यासाठी क्रिकेट हा एकमेव मुद्दा आहे? मला सध्या त्या मुलांची चिंता आहे जे करोना मुळे शाळेत आणि कॉलेजांमध्ये जाऊ शकत नाहीयेत. हेच विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आधी शाळा कॉलेज सुरू झाली पाहिजेत. क्रिकेट-फुटबॉल सारख्या खेळांच्या स्पर्धा नंतरही आयोजित केल्या जाऊ शकतात.
तुम्ही भावनिक होऊन म्हणू शकता की भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळली जायला हवी. पण सध्या सामने भरवणे ही प्राथमिकता मुळीच नाहीये. जर तुम्हाला पैसेच हवे असतील, तर तुम्ही सीमेपलीकडून भारताविरोधात करत असलेला दहशतवाद थांबवा आणि तो पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी वापरा, असेही कपील देव यांनी सुनावले.
भारताला जर आर्थिक मदतीची गरज भासली, तर देशभरातील विविध धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. लोक जेव्हा धार्मिक स्थळांना भेट देतात, तेव्हा ते शक्य ते सारं काही करतात. मग देशाला गरज भासली तर धार्मिक संस्थांनी मदत करणे गरजेचेच आहे, असेही देव म्हणाले. सर्वच भारतीय क्रिकेटपटूंनी शोएबच्या प्रस्तावाला नाकारले आहे.
माजी कर्णधार आणि भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर तर म्हणाले होते, एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडण्याची शक्यता जास्त आहे, पण सध्या भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका शक्य नाही. भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यानेही या प्रस्तावाला विरोध केला होता. पाकिस्तानशी सध्या आपले राजकीय संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. आमच्यासाठी कायमच भारत आणि भारतीयांचे स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. त्यालाच आम्ही कायम प्राधान्य देतो. पाकिस्तान आणि भारत या उभय देशांमधील संबंध जोपर्यंत सुधारत नाहीत, तोपर्यंत भारत-पाक क्रिकेट होऊनच नये, असे श्रीसंत म्हणाला.