वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “कोरोनाचे विषाणू शरीरातून बाहेर काढून जिवंत ठेवणे सोपे नसते. पण पुण्यातील वैज्ञानिक यात यशस्वी झाले आहेत. शरीराबाहेर काढलेल्या विषाणूंना जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना खाद्य द्यावे लागते. त्यानंतर या विषाणूसंदर्भातला सविस्तर अभ्यास करता येतो. त्याच्यावर कोणते औषध प्रभावी ठरु शकते याचा शोध घेता येतो. त्यामुळेच कोरोना विषाणू आयसोलेट केल्याचा पहिला फायदा म्हणजे त्याच्यावर मात करणारी उपचार पद्धतीचे संशोधन करता येणार आहे. यामुळे कोरोनावरची लस शोधण्याची संधी मिळेल,” असा विश्वास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केला.
कोरोनावर मात करणारे नवे औषध, परिणामकारक लस कधी निघेल, याचा विचार प्रत्येक नागरिकाला आहे, या संदर्भात डॉ. गंगाखेडकर बोलत होते. ते म्हणाले, “ इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणू उशिरा आला. त्याला आयसोलेट करण्यास काही कालावधी लागला. त्यामुळे कोरोना विरोधातली लस शोधण्याच्या कामात आपण एक-दीड महिना मागे आहोत. संशोधनाला थोडा वेळ द्यावा लागतो. आज मी सांगितले आणि उद्या औषध मिळाले, अशी स्थिती संशोधनात नसते. प्रभावी औषध शोधल्यानंतर त्याच्या चाचण्या घ्याव्या लागतात. विषाणूने त्याची संख्या वाढवल्यानंतर त्यावर औषधाचा परिणाम काय होतो, हे तपासावे लागते.”
लोकांनी निराश होण्याचे कारण नसल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आपण लॉकडाउनचे सर्वात प्रभावी अस्त्र वापरले आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना सरकारकडून वारंवार केली जात आहे. त्याचाही फायदा मिळणार आहे. दरम्यान, सध्या कोरोनाबाधितांची भारतातली संख्या बारा हजारांच्या पुढे गेली आहे. युरोपीय देश आणि अमेरिका या सारख्या प्रगत देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चालवलेली लढाई खूपच प्रशंसनीय ठरली आहे. जगभरात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, लॉकडाउन हे भारताने वापरलेले सर्वात प्रभावी अस्त्र असून सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, घरीच राहणे महत्त्वाचे आहे. कोरोना विषाणूला वाढू न दिल्यास नव्याने लागण होण्याचे प्रमाण कमी होईल.
वटवाघुळ आणि कोरोना
वटवाघुळाची पाहणी केल्यानंतर त्यांच्यात कोरोना विषाणू आढळून आला. तो माणसात आल्यानंतर त्याची प्रजा वाढू शकत नाही. मानवी शरीरात तो जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले. कोणताही नवा विषाणू आकाशातून किंवा इतर कुठून येत नाही. त्याचे संक्रमण प्राण्यांकडूनच मानवात होणे अपेक्षित असते. कोरोना विषाणू वटवाघुळात सापडत असल्याचे चीनमध्ये झालेल्या संशोधनात स्पष्ट झाले. केरळात निपा विषाणूचा प्रादुर्भाव वटवाघुळातून माणसाकडे झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी पशु-पक्ष्यांमधले कोणते विषाणू भारतात माणसांसाठी धोकादायक आहेत, याची पाहणी करणे गरजेचे वाटले. त्यामुळे आम्ही वटवाघुळांची पाहणी केली. तेव्हा वटवाघुळांमध्ये कोरोना विषाणू आढळला, असे त्यांनी स्पष्ट केले.