विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाविरुध्दच्या लढाईत आता छात्रसैनिकांची सेनाही उतरणार आहे. कोरोनाविरुध्द लढण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) एनसीसी योगदान अभियान सुरू केले आहे. देशातील गणवेशधारी युवकांची ही सर्वात मोठी संघटना आहे.
साथीच्या आजारा विरुद्धच्या लढाईत सहभागी असलेल्या विविध संस्थाच्या कार्यात एनसीसीचे विद्यार्थी मदत करणार आहे.
यासाठी एनसीसीने छात्रसैनिकांसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत. नागरी प्रशासनाला या विद्यार्थ्यांकडून मदत होणार आहे. या विद्यार्थ्यांकडून कॉल सेंटरचे व्यवस्थापन, मदतकार्यात मदत, अन्नधान्याची सार्वजनिक वितरण व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झाला आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काम दिले जाणार नाही.
एनसीसीचे शाळा आणि महाविद्यालय स्तरावर छात्रसैनिक आहेत. मात्र, केवळ १८ वर्षांपुढील छात्रसैनिकांनाच या अभियानात सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली आठ ते २० छात्रसैनिकांचा समूह विविध ठिकाणी पाठविला जाईल. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला एनसीसी कार्यालयाकडे आपली गरज पाठवावी लागेल. त्यानंतर हे छात्रसैनिक तैनात करण्यात येतील.