• Download App
    कोरोनाविरुध्दच्या लढ्यात पंतप्रधानांसोबत क्रीडापटूही उतरणार | The Focus India

    कोरोनाविरुध्दच्या लढ्यात पंतप्रधानांसोबत क्रीडापटूही उतरणार

    क्रीडापटूंनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे. आता देशाचे मनोधैर्य उंचावण्याची आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटूंना केले. नामवंत क्रीडापटूंशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून चर्चा केली.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : क्रीडापटूंनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे. आता देशाचे मनोधैर्य उंचावण्याची आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटूंना केले.

    नामवंत क्रीडापटूंशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून चर्चा केली. या महामारीच्या विरोधातील संघर्षात भारताचा विजय होणार हे निश्चित आहे असे सांगत पंतप्रधानांनी क्रीडापटू सक्रिय होतील, असा विश्वास व्यक्त केला.

    पंतप्रधान म्हणाले, कोविड-19 हे संपूर्ण मानवतेसाठी निर्माण झालेले भयंकर संकट आहे. दुसर्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलावी लागली यावरून या संकटाची तीव्रता लक्षात येऊ शकेल. या जागतिक साथीमुळे निर्माण झालेल्या आव्हानामुळे विम्बल्डन क्रीडा स्पर्धा आणि क्रिकेटची इंडियन प्रिमियर लीगसारख्या स्थानिक स्पर्धां देखील पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

    खेळाच्या मैदानात उल्लेखनीय कामगिरी करून देशाला सन्मान मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांनी या खेळाडूंची प्रशंसा केली. ते म्हणाले, खेळाडूंनी आता देशाचे मनोधैर्य उंचावण्यामध्ये योगदान द्यावे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या निदेर्शांचे लोकांनी सातत्याने पालन करत राहावे असे जनतेला आवाहन करावे. सोशल डिस्टन्सिंगच्या संदेशाचा प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

    शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या महत्त्वाकडे जनतेचे लक्ष वेधण्याची आणि आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहनही त्यांनी केले. खेळांचे प्रशिक्षण घेताना आव्हानांना कसे सामोरे जायचे, स्वयंशिस्त पाळायची, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवायचा या गोष्टी शिकवल्या जातात. आता याच सर्व गोष्टी या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी उपयोगी पडतील असे पंतप्रधानांनी सांगितले. महामारीच्या विरोधात संघर्ष करण्याचा संकल्प, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी संयम, सकारात्मक वृत्ती कायम राखण्यासाठी सकारात्मकता, या लढाईमध्ये आघाडीवर राहून सैनिकांप्रमाणे लढणार्या वैद्यकीय समुदाय, पोलिस इत्यादींसहित इतर सर्वांचा सन्मान आणि वैयक्तिक तसेच राष्ट्रीय पातळीवर पीएम- केअर्स निधीमध्ये योगदानाच्या माध्यमातून सहयोग या पंचसूत्रीचे आवाहन केले.

    अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पंतप्रधान करत असलेल्या नेतृत्वाबदद्ल क्रीडापटूंनी प्रशंसा केली. या लढ्यामध्ये आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी आणि पोलिस करत असलेल्या निष्काम सेवेची दखल घेत त्यांना जो सन्मान मिळायला हवा तो देत असल्याबद्दल या खेळाडूंनी पंतप्रधानांचे आभार मानले. शिस्त, मानसिक सामर्थ्य, तंदुरुस्ती राखण्यासाठी योग्य जीवनपद्धती आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक उपाय याबाबत या खेळाडूंनी चर्चा केली.

    भारतरत्न सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल, अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, कबड्डी खेळाडू आणि हिमाचल प्रदेशचे डीएसपी अजय ठाकूर, महिला धावपटू हिमा दास, दिव्यांग उंच उडीपटू शरद कुमार, टेनिसपटू अंकिता रैना, नामवंत क्रिकेटपटू युवराज सिंग, पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासह देशभरातले विविध क्रीडाक्षेत्रातले सुमारे 40 क्रीडापटू या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवादात सहभागी झाले होते. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी देखील या संवादात सहभागी झाले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…