सर्व राजकारण बाजूला ठेवत देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारसोबत उभे राहण्याचा निर्धार केला आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला सर्व मदत करू असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सर्व राजकारण बाजूला ठेवत देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारसोबत उभे राहण्याचा निर्धार केला आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला सर्व मदत करू असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे.
देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सरकारला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. याबाबत सरकारच्या पाठीशी उभे राहू असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली.
कोरोनाविरुध्दच्या या लढाईत भारतीय जनता पक्ष सरकारसोबत आहे, अशी ग्वाही त्यांना दिली. संकटाच्या या काळात आम्ही सारे सोबत आहोत. राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. आम्ही भाजपा आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.
रेशन वितरणाबाबत राज्य सरकारच्या दोन वेगवेगळ्या आदेशांवर फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. वितरकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असा दावा फडणवीस यांनी केला होता. या अनुशंगाने रेशन धान्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या आणि कामगारांचे प्रश्न याबाबतही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले.