कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुध्द सरकारला लढाईसाठी खेळाडूंनी आर्थिक मदतीचे बळ देऊ केले आहे. प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने ५० लाख रुपयांची मदत दिल्यावर आता भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने ८० लाख रुपयांची मदत दिली आहे. कोरोनाविरोधातील लढाईसाठी अनेक खेळाडूंनी आपापल्या पध्दतीने मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुध्द सरकारला लढाईसाठी खेळाडूंनी आर्थिक मदतीचे बळ देऊ केले आहे. प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने ५० लाख रुपयांची मदत दिल्यावर आता भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने ८० लाख रुपयांची मदत दिली आहे.
कोरोनाविरोधातील लढाईसाठी अनेक खेळाडूंनी आपापल्या पध्दतीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी बजरंग पुनिया, गौतम गंभीर या खेळाडूंनी मदतीचा हात पुढे करत आपला पगार सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. सौरव गांगुलीने गरजू लोकांना तांदूळ वाटण्याचा निर्णय घेतला आहे. पी. व्ही सिंधूने १० लाखांची मदत केली आहे.
या आजाराविरुद्ध लढणे देशाच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे रोहित शर्मा याने सांगितले. मुंबईतील खेळाडूंना पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी दोन्हीमध्ये मदत करण्याची भूमिका घेतली आहे. रोहितने पंतप्रधान सहायता निधीमध्ये ४५ लाख रुपयांचे मदत दिली असून महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २५ लाख रुपयांचे योगदान दिले. याशिवाय त्याने लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाना मदत करणार्या झोमॅटो फिडिंग इंडिया संस्थेला ५ लाख आणि मोकाट श्वानांची काळजी घेणार्या एका संस्थेला ५ लाख रुपयांची मदत केली आहे. सचिन तेंडुलकरनं २५ लाख रुपये पंतप्रधान मदत निधी आणि २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतलाय.
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 10 लाख लाखांची मदत केली आहे. युसूफ आणि इरफान पठाण या बंधूंनी बडोदा पोलीस आणि आरोग्य विभागाला ४००० फेस मास्क दिले आहेत. बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येक ५-५ लाखांची मदत दिली आहे. आशियाई स्पधेर्तील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोपडाने कोविड-१९ महामारीविरुद्धच्या देशाच्या लढाईमध्ये केंद्र व हरियाणा राज्य सरकारच्या सहायता निधीमध्ये एकूण तीन लाख रुपये दिले आहेत.
भारतीय खेळाडूंनी मदत केली असली तरी जगातील काही खेळाडूंना खूपच जास्त मदत केली आहे.दिग्गज फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने ८.२८ कोटी रुपये दान केले आहेत. स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने ७.७७ कोटी रुपये, लियोनेल मेसीने ८.२८ कोटी रुपये कोरोनाविरुध्द लढाईसाठी आपल्या देशाला दिले आहेत.