‘बुलंद भारत की बुलंद तसबीर’ या टीव्हीवरील जाहिरातीतून घराघरात पोहोचलेल्या बजाज उद्योगसमुहाने गुरुवारी मोठी घोषणा केली. कोरोना विरोधातल्या लढ्यासंदर्भातली ही घोषणा आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोविड – 19 च्या विरुद्ध लढण्यासाठी देशाने एकजूट होण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यास पुण्याच्या बजाज उद्योगसमुहाने कृतीशील पाठींबा दिला आहे. कोविड-19 विरोधातील लढ्यासाठी बजाज उद्योगसमुह शंभर कोटी रुपये देत असल्याची घोषणा या उद्योगाचे प्रमुख राहुल बजाज यांनी गुरुवारी (ता. 26) केली.
सरकार आणि आम्ही काम करत असलेल्या देशातल्या दोनशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पैसा जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी आम्ही घेऊ, असे राहुल बजाज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राहुल बजाज यांच्या या घोषणेचे स्वागत त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. पवारांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्योगपती राहुल बजाज यांना धन्यवाद दिले असून बजाज यांनी कुटुंब परंपरेचे मूल्य आणि वारसा स्वीकारल्याचे म्हटले आहे. राहुल बजाज हे नेहमीच देशासाठी अतिशय उदारपणे मदत करत असल्याचेही पवारांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, राहुल बजाज यांनी सांगितले, की गेल्या 130 वर्षांपासून बजाज उद्योगसमुह समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्याच्या कोरोना विषाणू विरोधातील लढ्यातदेखील आमचा सहभाग असेल. कोविड -19 च्या विरोधात लढण्यासाठी पुण्यातील आरोग्य सेवांमधील पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न करु. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागांचे आधुनिकीकरण, वेंटिलेटरची उपलब्धता यासह व्यक्तिगत जीवनदायी संरक्षण उपकरणांची खरेदी, चाचणीसाठी आवश्यक सुविधा आदींसाठी मदत करु.
पुण्यासह, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही मदत करणार असल्याचे बजाज म्हणाले. त्यांनी सांगितले, की हातावर पोट असणाऱ्या आणि रोज मजुरी करुन जगणाऱ्या कामगारांसाठी, बेघर आणि पदपथावर राहणाऱ्या मुलांसाठी अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी आम्ही तातडीने काही संस्थांसोबत काम करत आहोत. गेल्या काही आठवड्यांत खेड्यांमध्ये स्थलांतर वाढले आहे. ग्रामीण भागातील जगणे सुसह्य करण्यासाठी थेट अनुदान, रोजगाराच्या संधी यासाठी आम्ही प्रयत्न करु. ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकट करण्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्रे आणि इतर आवश्यक सुविधांच्या बळकटीकरणासाठी आम्ही निधी खर्च करु.
आरोग्य सेवा, स्वच्छता आणि आपत्कालीन सहाय्य कामगार आणि स्थानिक पोलिसांना सलाम करतो, या शब्दात राहूल बजाज यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या साथीच्या रोगाचा लढा देण्यासाठी शक्य त्या मार्गाने मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे बजाज यांनी नमूद केले आहे.