विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना व्हायरसच्या फैलावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्व सरकारे प्रतिबंधात्मक उपाय योजत असताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ मात्र पूर्णपणे बेफिकीर असल्याचे दिसले.
कोरोना प्रतिबंधासाठी दोन्ही सरकारांनी जमावबंदी, शाळा, महाविद्यालये बंद, सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध अशा उपाययोजना कायद्याचे बंधन घालून लागू केल्या आहेत. पण छगन भुजबळांना याचे भानही नाही. ते आपल्याच राज्य सरकारने काढलेले आदेश धाब्यावर बसवत पुण्यातील हडपसरमधील एका शाळेच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले. या कार्यक्रमास सुमारे दीड हजार नागरिक उपस्थित होते. त्यांचे बाईट मीडियातून आणि सोशल मीडियातूनही प्रसिद्ध झाले. आधी दोन वेळा कार्यक्रम रद्द झाल्याने हा छोटेखानी समारंभ केल्याचा खुलासा भुजबळांनी केला. पण मंत्र्यालाच खुलासा करावा लागावा, अशा समारंभात कोरोनासारखा गंभीर आजार पसरत असताना आणि शासकीय प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू होत असताना भुजबळांसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी हजेरी लावावीच का, याचा खुलासा मात्र झालेला नाही.