• Download App
    कोरोनाबाधीतांच्या रुग्णालयात येणार्‍यांचे 15 सेकंदात निर्जंतुकीकरण; पुण्यात सुरु महाराष्ट्रातला पहिला ‘मिस्ट सॅनिटायझर कक्ष’ | The Focus India

    कोरोनाबाधीतांच्या रुग्णालयात येणार्‍यांचे 15 सेकंदात निर्जंतुकीकरण; पुण्यात सुरु महाराष्ट्रातला पहिला ‘मिस्ट सॅनिटायझर कक्ष’

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी पुणे महापालिकेने डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात ‘मिस्ट सॅनिटायझर’ कक्ष सुरु केला आहे. डॉ. नायडू रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा कक्ष उभारला आहे. या कक्षाची उभारणी करणारी पुणे महापालिका महाराष्ट्रातली पहिली महापालिका ठरली आहे.

    डॉ. नायडू रुग्णालयात चिनी विषाणूने बाधीत रुग्णांवर उपचार केले जातात. या मुळे येथे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या दृष्टीने रुग्णालयात येताना आणि जाताना या कक्षामधून जावे लागणार आहे. या कक्षात निर्जंतुकीकरणाची सुविधा दिली आहे.

    चिनी विषाणूच्या वाढत्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला प्रतिसाद देत मिस्ट रेझोनन्स इंजिनिअरिंग या कंपनीने मिस्ट सॅनिटायझर देणगी स्वरुपात पालिकेला तयार करुन दिला. कंपनीचे संचालक मकरंद चितळे यांनी सांगितले की, चीन आणि तुर्कस्थानात अशा प्रकारच्या उपाययोजनांचे काही व्हिडीओ माझ्या पाहण्यात आले होते. त्यावरुन हा कक्ष उभारण्याची कल्पना सुचली. त्यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मोहोळ यांनी अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना याविषयात लक्ष घालण्यास सांगितले.

    अगरवाल यांनी कंपनीला हा कक्ष उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या उपलब्ध करुन दिल्या. तसेच या कक्षासाठी त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून काम पूर्णत्वास नेले. अवघ्या तीन ते चार दिवसातच हा कक्ष उभारला गेला. या कक्षामुळे रुग्णालयातून आत-बाहेर कराव्या लागणा-या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी, नर्से आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्या निर्जंतुकीकरण होणार आहे.

    कक्षात काय आहे ?

    डॉ. नायडू रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील या कक्षात ये-जा करण्यासाठी मार्गिका तयार केल्या आहेत. बोगद्याच्या आकाराचा हा कक्ष बारा फुटांचा आहे. त्याच्यामध्ये मिस्ट सॅनिटायझर चेंबर असून मोशन सेन्सर बसविण्यात आले आहेत. मिस्ट ब्लोअरही बसविण्यात आलेले आहेत. कक्षाच्या बाहेर सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत. व्यक्ती आत गेल्यावर ‘मिस्ट फॉग’ कार्यान्वित होतो. सोडियम हायपोक्लोराईडचे द्रावण फवारले जाते. व्यक्ती पूर्णपणे निर्जंतूक होण्याकरिता किमान १५ सेकंद आतमध्ये असणे आवश्यक आहे. व्यक्ती बाहेर गेल्यानंतर हा सेन्सर आपोआप बंद होतो.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…