विशेष प्रतिनिधी
चंदीगड : दिल्ली, पंजाब, राजस्थान या सीमावर्ती राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना हरियाणात मात्र कोरोना संक्रमणाला अटकाव करण्यात यश आले आहे.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने राज्याच्या सीमा सील करून दिल्ली, पंजाब, राजस्थानमधून जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व वाहतूक रोखली. त्यामुळे संक्रमणाला अटकाव झाला.
हरियाणातून दिल्लीत नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. पण लॉकडाऊनमुळे त्यांचे प्रवासही बंद आहेत. अशा स्थितीत हरियाणातील कोरोना प्रादूर्भाव फैलावाला वाव मिळाला नाही. चाचण्यांचे प्रमाण वाढवून तातडीने उपचाराची व्यवस्था सरकारने केली. लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली त्यातून कोरोनाचा समूह संक्रमणाला पायबंद बसू शकला.
हरियाणातील ३०८ कोरोनाग्रस्तांपैकी २२४ रुग्ण बरे झाले. ८१ जणांवर उपचार सुरू आहेत तर तिघांचा मृत्यू झाला आहे. या तुलनेत दिल्ली, पंजाब व राजस्थानची आकडेवारी बरीच अधिक आहे.
महाराष्ट्राने कोरोनाग्रस्तांचा १० हजारांचा आकडा ओलांडला आहे, तर त्या पाठोपाठ दिल्लीचा नंबर आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणातील आकडेवारी दिलासादायक आहे. विशेष, गुरुग्राम सारखे औद्योगिक शहर असताना ही हरियाणाला यश आले आहे.