विशेष प्रतिनिधी
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टनसिंगचे आवाहन सरकारकडून केले जात असताना राज्यातील मंत्रीच ते पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना होम क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. सुदैवाने त्यांचो कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचेही सांगण्यात येत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. हे पोलीस अधिकारी मुंब्रा येथे कार्यरत आहेत. आव्हाड त्यांच्यासोबत पाहणी करण्यासाठी मुंब्रा येथे गेले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क आलेल्या अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे.
मुंब्रा येथे कार्यरत असणारा एका पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचाही समावेश आहे. जितेंद्र आव्हाडदेखील या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. यामुळे त्यांनाही होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे.