• Download App
    कोरोनाच्या लढाईतील अग्रणी डॉ. रमण गंगाखेडकर | The Focus India

    कोरोनाच्या लढाईतील अग्रणी डॉ. रमण गंगाखेडकर

    कोरोनाचे संकट भारतात पोहोचल्यावर सुरूवातीपासून भारताने उचललेल्या लॉकडाऊनसारख्या धाडसी निर्णयांत डॉ. रमण यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे. कोरोनासारख्या महामारीवर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने आणि अदृश्य शत्रूसारखा हल्ला करणाऱ्या या विषाणूपुढे अमेरिका, ब्रिटन, स्पेन व इटलीसारखे प्रगत देश अक्षरशः भुईसपाट झाले असताना सव्वाशे कोटींचा भारत भक्कमपणे ह्या संकटाचा मुकाबला करतोय. कोरोना योद्धा म्हणून आपण सगळ्या डॉक्टर्सला म्हणत असू तर डॉ. रमण हे ह्या युद्धातील सेनापती आहेत…


    गजानन  उदार,  लासलगाव (जि. नाशिक) 

    सध्या राष्ट्रीय पातळीवर माध्यमांमध्ये एक मराठी नाव सातत्याने झळकतंय. चीनी व्हायरस कोरोना संक्रमणापासून देशाला वाचविण्यासाठी भगिरथ प्रयत्न करत असणारे डॉ. रमण गंगाखेडकर.

    भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद अर्थात ICMR ही संस्था भारतीय वैद्यकीय संस्थांतील अग्रणी संस्था. विविध आजारांवरील संशोधन व तपासण्यांचे प्रोटोकॉल आखणाऱ्या ह्या संस्थेत महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले डॉ. गंगाखेडकर एवढया उच्चपदावर पोहोचले आहेत.

    १९५९ मध्ये जन्मलेल्या रमण यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील जिल्हा परिषदेच्या पत्र्याच्या शाळेत १० वी पर्यंत झाले. कुशाग्र व अभ्यासू असे रमण यांचा १० वीत गुणवत्ता यादीत आले. इंटरपर्यंतचे शिक्षण धर्माबादच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात पूर्ण करताना गुणवत्ता यादीतले सातत्य राखून success is never accidental चा प्रत्यय त्यांनी आणून दिला.

    अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पहिले वर्ष पूर्ण केल्यावर MBBS ची बाकी वर्षे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केली. ज्ञानाची भूक मोठी असणारे रमण यांनी पदव्युत्तरसाठी तयारी केली आणि ‘पिडियाट्रीक्स’ मधून एम डी पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षणाचा पाया खोलवर रुजल्यावर त्यांच्या करियरला खरी कलाटणी मिळाली ती पुण्यात.

    1996 मध्ये पुण्यात गाडीखाना रुग्णालयात कार्यरत असताना ‘महिलांवरील एड्सचा संसर्ग’ यावरील त्यांच्या शोधनिबंधाला जगाने अक्षरशः डोक्यावर घेतले. जागतिक पातळीवर एडसचे थैमान सुरू असताना एड्सविरोधात जागतिक प्रतिबंधक कार्यप्रणाली विकसित करण्यात आली ती डॉ रमण यांच्या संशोधनाने. १९९८ मध्ये ‘आईकडून मुलाला होणारे एड्सचे संक्रमण’ ह्या विषयावरील त्यांच्या संशोधनाने जागतिक पातळीवर डॉ. रमण गंगाखेडकर हे नाव जगन्मान्यतेचे धनी ठरले.

    जगात साथ आणि संसर्गजन्य रोगांवरील अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील जॉन्स हापकीन इन्स्टिट्यूट मध्ये डॉ. रमण यांनी ‘मास्टर इन पब्लिक हेल्थ’ ही पदवी संपादन केली. नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रेशनमध्ये शनल ब्यूरो म्हणून व पुढे इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन नॉटामी मध्ये काम करत ICMR मध्ये उच्चपदावर पोचले.

    वूहान मधून सुरू झालेल्या कोरोनाचे संकट भारतात पोहोचल्यावर कोरोना युद्धात सुरूवातीपासून भारताने उचललेल्या लॉकडाऊनसारख्या धाडसी निर्णयांत डॉ. रमण यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे. कोरोनासारख्या महामारीवर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने आणि अदृश्य शत्रूसारखा हल्ला करणाऱ्या ह्या विषाणूपुढे अमेरिका, ब्रिटन, स्पेन व इटलीसारखे प्रगत देश अक्षरशः भुईसपाट झाले असताना सव्वाशे कोटींचा भारत भक्कमपणे ह्या संकटाचा मुकाबला करतोय. कोरोना योद्धा म्हणून आपण सगळ्या डॉक्टर्सला म्हणत असू तर डॉ. रमण हे ह्या युद्धातील सेनापती आहेत.

    सर्व राज्यांना टेस्टिंग प्रोटोकॉल देणे, मार्गदर्शन करणे आणि त्याचवेळी पिड टेस्टिंग कीट व प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी प्रयत्न करणे ही भीमकाय जबाबदारी यथार्थतेने डॉ. रमण सांभाळत आहेत. सगळे करताना माध्यमांना सामोरे जाताना शास्त्रीय भाषेला सहजसोप्या भाषेत सांगण्याची लकब, आकडेवारी व अगदी भीषणताही स्पष्ट करताना जनमानसाला आश्वस्त करणारी भाषा आणि वादग्रस्त प्रश्नांना बगल देण्याचे कौशल्य यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांत भारताचा हा चेहरा प्रेरणादायी आहे.

    कोरोना संकटात डॉ. रमण यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कान व डोळे म्हटले जात आहे. यापेक्षा वेगळी ती उंची काय असेल…!! योगायोग असा की २५ जानेवारी २०२० ला डॉ. रमण यांना एड्स व संसर्गजन्य आजारांवरील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरविले आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??