विशेष प्रतिनिधी
पुणे : फास्ट सेन्स डायग्नोस्टिक या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने कोविड-19 च्या शोधासाठीचे दोन मॉड्यूल विकसित करण्याच्या जवळ पोहोचले आहे. कोरोना बाधीत रुग्णांचा शोध घेण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या पद्धतींच्या तुलनेत कमी वेळेत विश्लेषण करणारी सुधारित पॉलिमरेझ शृंखला प्रतिक्रिया (पीसीआर) आधारित शोध संच शोधण्याचे काम या कंपनीने चालू केले आहे. यामुळे एका तासात अंदाजे 50 नमुने तपासले जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्या भारताची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता जलद तपासणीसाठी एक पोर्टेबल चिप आधारित मॉड्यूल तयार केले जात आहे. यात 15 मिनिटांपेक्षा कमी वेळात प्रत्येक नमुन्याची तपासणी करून रिझल्ट मिळणार आहे. भविष्यात प्रमाणित चाचण्यांसाठी नमुना आकार देखील प्रती तास 100 नमुन्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो.
“कोविड-19 चाचणीतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे गती, खर्च, अचूकता आणि देखभाल किंवा वापराच्या जागी उपलब्धता” हे आहे. ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक स्टार्ट अपने सर्जनशील आणि अभिनव मार्ग विकसित केले आहेत. तांत्रिक स्तरावर त्या योग्य वाटल्या तर व्यापारीकरणाच्या दृष्टीने सुलभरीत्या त्यांचा विकास व्हावा यासाठी डीएसटी यातील सर्वात होतकरू लोकांना पाठिंबा देत आहे. असे डीएसटी चे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी सांगितले. पुण्यातल्या कंपनीने कोविड-19 साठी कोव्ह-सेन्स तंत्रज्ञानाचा प्रस्ताव दिला आहे. कोव्ह-सेन्ससाठी पेटंटही दाखल करण्यात आले आहे.
प्रस्तावित दोन्ही मॉड्यूल विमानतळ, दाट लोकवस्तीचे क्षेत्र, रुग्णालये अशा गर्दीच्या ठिकाणी आणि हॉटस्पॉट्सवर तैनात करता येणार आहेत. यामुळे निरोगी व्यक्तींमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांची तपसणी केली जाऊ शकते आणि एका तासापेक्षा कमी वेळात सहज माहिती उपलब्ध होऊ शकते. हे अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी कंपनी याचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने काम करत आहे. ही टीम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीबरोबर काम करण्याची योजना आखत आहे. कामगिरीच्या मूल्यांकनासाठी औपचारिक मान्यता प्रक्रिया चालू आहे.