विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशातील उत्पादकांकडून एन ९५ मास्क, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढत आहे. पण भारताची गरज पूर्ण करण्यासाठी दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममधील पुरवठादारांशी संपर्क सुरू आहे, अशी माहिती आरोग्य सचिव लव आगरवाल यांनी दिली. देशातील हॉस्पिटलमध्ये ११.९५ लाख एन ९५ मास्क उपलब्ध आहेत. देशातील दोन कंपन्या प्रतिदिन ५० हजार एन ९५ मास्कचे उत्पादन सुरू करणार आहेत.
पुण्यातील डीआरडीओ प्रतिदिन २० मास्कचे उत्पादन सुरू करीत आहे. देशात ३.३४ लाख वैयक्तिक सुरक्षितता उपकरणे उपलब्ध आहेत. नोएडामधील अग्वा हेल्थकेअर कंपनी १० हजार व्हेंटिलेटर्सचे उत्पादन सुरू करणार आहे. पुण्यातील एक स्टार्टअप युनिट निगेटिव्ह आयन जनरेटर साइटेक एरॉन विकसित केले आहे.
मास्क निर्मितीमध्ये केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालयाचे सहकार्य घेण्यात येत आहे. कोरिया, व्हिएतनामच्या बरोबरच तुर्कस्तानमधील पुरवठादारांशी चर्चा सुरू करण्यात येत आहे.