वृत्तसंस्था
भोपाळ : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यावर स्वतःचा मोबाईल फोन बंद ठेवण्याची वेळ आली. धार्मिक आणि राजकीय टोमणेबाजीमुळे दिग्विजय सिंह हे नेहमीच वादाच्या भोवर्यात असतात.
यावेळी मात्र दिग्विजय सिंह यांनी मोबाईल कंपनीशी स्वतः बोलून देखील त्यांची अडचण दुर झाली नाही. “या स्थितीत मला माझा मोबाईल नंबरच बंद करावा लागेल,” असं म्हणत त्यांनी मोबाईल बंद केला.
झाले असे की, गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत येत असलेल्या फोन कॉल्समुळे अस्वस्थ झालेल्या दिग्विजय सिंह यांनी आपला मोबाइल फोन बंद केला आहे. त्यांनी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी ट्विट केले की, “हे चार-पाच दिवस मला त्रास देत असलेले फोन कॉल आहेत. मी एमपीच्या डीजीपीकडे तक्रार पाठविली. मी सेवा प्रदात्याशी बोललो पण ते थांबत नाहीत. दुर्दैवाने या परिस्थितीत मला माझा मोबाईल नंबरच बंद करावा लागतो. ” त्यांनी दुसर्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे मी भोपाळच्या घरी असून लँडलाइन नंबरवर उपलब्ध आहे.”
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंह यांना येणार्या कॉल्सवरून आक्षेपार्ह भाषा वापरली जात होती. वेळीअवेळी त्यांना फोन करुन प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे त्यांनी कॉल घेणेच बंद केले. तरी कॉल येणे थांबले नाही. या संदर्भात दिग्विजय यांच्या लँड लाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे असे कोणते प्रश्न होते आणि ते कोण विचारत होते ज्यांना दिग्विजय सिंह गप्प करु शकले नाहीत, त्यांना स्वतःचाच फोन बंद करावा लागला, याची चर्चा मध्य प्रदेशात रंगली आहे.