विशेष प्रतिनिधी
जुन्नर : काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील एका साखर कारखानदाराने एका सामाजिक कार्यकर्त्याला बंगल्यावर बोलवून आव्हाड स्टाईल मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या कारखानदाराची पाठराखण केली आहे.
निराधार-मनोरुग्णांची संस्था चालवणार्या अक्षय बोर्हाडे या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिल्यावर शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यकर्त्याला अशाच प्रकारचे एका कार्यकर्त्याला बंगल्यावर बोलावून मारहाण केली होती. त्याच पध्दतीने ही मारहाण झाली आहे.
सत्यशील शेरकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून मारहाण केली, तसेच बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप अक्षय बोर्हाडेने केला होता. याप्रकरणी त्याने फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली होती.
अक्षयच्या आरोपानंतर विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अक्षयला पाठिंबा देत त्याला मारहाण करणार्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.
अनेक तरुण-तरुणींनी जुन्नर पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तसेच सत्यजीत शेरकर यांना योग्य शिक्षा देण्याची मागणी लावून धरली होती. अखेर आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान अक्षयला खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा देत त्याला मारहाण करणार्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.
जुन्नर तालुक्यातील शिरोली या गावचा तरूण युवक असलेला अक्षय हा तरूण समाजसेवेच्या एका ध्येयाने झपाटला होता. या आपल्या ध्येयातूनच त्याने शिवॠण प्रतिष्ठानची स्थापना केली. या माध्यमातून राज्यातील बेघर मनोरुग्णांना निवारा देण्याचे काम अक्षय करत असतो.
याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, काल सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोर्हाडे यांच्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया तसेच फोन आले. या प्रकरणाची योग्य ती चौकशी सुरू आहे. विनंती आहे की पोलीस खात्याला त्यांचं काम करू द्यावं. कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवावा.