विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्यांनी क्रुरकर्मा कसाब विरोधात निर्भिड साक्ष देऊन त्याला फाशीपर्यंत पोहोचवलं. पण आज त्या वृद्धाला स्वत:च्या जीवितासाठी मात्र झुंजावं लागतयं. जीवितासाठीची ही झुंज रस्त्यावर येऊन ठेपली आणि भाजप साथीला आला. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर असे त्यांचे नाव. कसाबच्या खटल्यातले ते मुख्य साक्षीदार आहेत.
२६/११ च्या हल्ल्यात श्रीवर्धनकर यांना एक गोळीही लागली आहे. कसाब खटल्यात त्यांची साक्ष निर्णायक महत्त्वाची ठरली. मात्र
कौटुंबिक कारणातून काही झाल्याने त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. चिंचपोकळीतील एक व्यापारी डिन डिसुजा यांना ते सात रस्ता भागात आढळले. त्यांनी ही माहिती त्यांच्या गायकवाड या मित्राला दिली.
गायकवाड एक एनजीओ चालवतात. त्यांनी प्रयत्न करून तसेच पोलिसांनीही प्रयत्न करून श्रीवर्धनकर यांना मदतीचा हात दिला. त्यांचे कल्याणमधील घर शोधून, मुलाला शोधून त्यांची पुन्हा घरातच राहण्याची सोय करण्याचा प्रयत्न केला. पण तेथेही काही कौटुंबिक वाद आडवे आले. श्रीवर्धनकर यांचे कुटुंबीय त्यांना वृद्धाश्रमात राहण्यासाठी विचारू लागले.
पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ आली पण यावेळी भाजप त्यांच्या मदतीला धावून आला आहे. श्रीवर्धनकर यांच्या उपचाराचा व जीविकेचा खर्च उचलण्याची तयारी भाजपने दाखविली आहे. कल्याणच्या आयुष हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आजारावर उपचार सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे श्रीवर्धनकर यांना भेटायला येऊन गेले. त्यांनी श्रीवर्धनकर यांची विचारपूस केली.