देशातील दुर्गम भागात चीनी विषाणूबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील दुर्गम भागात चिनी विषाणू संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.
सामुदायिक रेडिओ म्हणजे परिवर्तनाचे पाईक असल्याचे जावडेकर म्हणाले. या केंद्रांपर्यंत संपर्क अभियानांतर्गत पोहोचण्याच्या एक विशेष भाग म्हणून जवळपास 300 सामुदायिक रेडिओ केंद्रांना संबोधित करताना ते बोलत होते. सरकार लवकरच अशा स्थानकांची संख्या वाढविण्याची योजना घेऊन येईल असे त्यांनी सांगितले.
कम्युनिटी रेडिओ केंद्रे स्वयं-शाश्वत व्हावीत म्हणून त्यांचा जाहिरात प्रसारण कालावधी वाढविण्यासाठी सरकार उत्सुक असल्याचे जावडेकर म्हणाले. त्यांनी सांगितले की, सध्या कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटे आहे तर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तो 12 मिनिटे आहे. सर्व रेडिओ केंद्रांना समान वेळ देण्यास उत्सुक आहोत जेणेकरुन त्यांना निधी मिळविण्याची गरज भासू नये. कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करताना 75 टक्के खर्च मंत्रालयाकडून केला जातो जो निश्चित खचार्चा मोठा हिस्सा असतो.
जाहिरात प्रसारणाच्या वेळेत बदल केल्यामुळे कम्युनिटी रेडिओ केंद्रांना त्यांच्या परिचालन खर्चात मोठ्या प्रमाणावर मदत होईल.
बातम्या प्रसारित करायला देण्याविषयीच्या कम्युनिटी रेडिओच्या केंद्रांच्या मुख्य मागणीबाबत जावडेकर म्हणाले, एफएम रेडिओ वाहिन्यांवरून ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात त्याच प्रकारे कम्युनिटी रेडिओवर बातम्या प्रसारित करण्यासंबंधी आपण विचार करू.
बनावट बातम्यांचा धोका ओळखून बातम्या प्रसारित करण्यापूर्वी स्थानिक स्रोतांच्या माध्यमातून त्या बातम्यांची सत्यासत्यता पडताळून मोलाची भूमिका बजावावी. त्या बातम्या ऑल इंडिया रेडिओलाही पाठवाव्या जेणेकरून सत्य पडताळणीला अधिक बळ मिळेल. मंत्रालयाने पत्र सूचना कार्यालयांतर्गत एक सत्यासत्यता पडताळणी विभाग अर्थात फॅक्ट चेक सेल तयार केला आहे आणि कम्युनिटी रेडिओ हे या फॅक्ट चेक सेलच्या भूमिकेस पूरक ठरू शकतात