विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘हॅलो सिस्टर, नमस्कार ! मी दिल्लीतून पंतप्रधान कार्यालयातून दिल्लीतून बोलतोय…’ असं ऐकल्यानंतर खरं तर त्यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं त्यांना. आधीच कोरोनाच्या उद्रेकामुळे अहोरात्र कामाचा ताण…त्यात कोणाला लहर आली गंमत करायची, असंच वाटलं त्यांना. पण तसं नव्हतं. हा कॉल खरंच ‘पीएमओ’मधूनच होता.
गेल्या 3 दशकांच्या सेवेत मुख्यमंत्री कार्यालय सोडाच पण जिल्हाधिकारी कार्यालयातूनही कधी विचारणा झाली नव्हती….आणि आज ‘पीएमओ’तून आपुलकीनं चौकशी होत होती. आभार मानले जात होते. काळजी घेण्यास सांगितलं जात होतं. यामुळं फोन घेणार्या नर्स भारावून गेल्या नसत्या तरच नवल होतं झालं ते असं – पुण्यातल्या डॉ. नायडू रुग्णालयातील ज्येष्ठ नर्स छाया यांना थेट पीएमओ’तून फोन आला, “सध्याच्या कोरोनाच्या बिकट स्थितीत तुम्ही काम करत आहात. कसे चालले आहे? तुम्ही कशा आहात?.”
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील नर्ससोबत ‘पीएमओ’तून थेट संवाद साधला जात आहे. अथक काम करणार्या नर्स यांचे मनोबल वाढवणे, त्यांना प्रोत्साहन देणे, संकटकाळात त्या देत असलेल्या सेवेप्रती आदर व्यक्त करणे, हा यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले. याच सोबत रुग्णालयाचा आढावाही घेतला जात आहे.
छाया दिवसभरचे काम संपवून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्यांना फोन आला. नायडू रुग्णालयातील कोरोना बाधितांची संख्या, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण, उपचार पद्धती याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांना काही निरोप द्यायचा आहे का, असेही त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सगळी मदत होते आहे. काहीही अडचण नसल्याचे सांगितले. ‘तुम्ही स्वतःच्याही प्रकृतीची काळजी घ्या. देश तुमचा आभारी आहे,’ अशा भावना व्यक्त करुन ‘पीएमओ’तला फोन ठेवला गेला.
यानंतर छाया यांनी प्रसार माध्यमांना सांगितले, की नायडू हॉस्पिटलमधल्या सर्व सहकार्यांच्या वतीने मी बोलले. थेट पंतप्रधान कार्यालयाने आमच्या सेवेची दखल घेतल्याने आमच्या सगळ्यांचाच हुरुप वाढला आहे. पंतप्रधान कार्यलयाने आमची दखल घेतली याचा आम्हाला अभिमान वाटतो. इतक्या वर्षात यापूर्वी कधीच असा अनुभव आलेला नाही. कोरोनाविरुद्धची लढाई आता आम्ही आणखी जोमाने लढू.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित आणि संशयितांवर डॉ. नायडू रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी या रुग्णालयातून पाच कोरोना बाधीत ठणठणीत बरे होऊन बाहेर पडले आहेत, हे विशेष.