मराठवाड्यातील लाखो ऊसतोडणी मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यावर कोणताही निर्णय न घेणार्या राज्यातील महाआघाडी सरकारवर पंकजा मुंडे संतापल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : मराठवाड्यातील लाखो ऊसतोडणी मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यावर कोणताही निर्णय न घेणार्या राज्यातील महाआघाडी सरकारवर पंकजा मुंडे संतापल्या आहेत.
“ऊसतोड मजुरांचा निर्णय तातडीने घ्या. त्यांचा संयम सुटणार नाही याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी १५ दिवस आहेत. त्यांच्यातला एकहीजण साधा शिंकलाही नाही, मग काय चिंता आहे? त्यांना पाठवण्याचा निर्णय झालेला असताना कोण आहेत झारीतले शुक्राचार्य ?,” असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ऊसतोडणी मजुरांना घरी पाठविण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर याबाबतचा निर्णय झाल्याचेही ते म्हणाले. परंतु, त्याबाबतची कार्यवाही झालेली नाही.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील सर्व उद्योग ठप्प झाले. खासगी कंपन्यांच्या कामगारांना देखील सुट्टी देण्यात आली. ज्यांना शक्य आहे, त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, आज ही राज्यातील अनेक साखर कारखाने चालू आहेत. याचा परिणाम म्हणून या कामावर असलेले ऊसतोड कामगार फडामध्ये काम करत आहेत. बीड जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी गेलेले लाखो कामगार अद्यापही फडावर काम करत आहेत. कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने अद्याप सुरु असल्याने या कामगारांना कारखान्यांनी काम सोडून जाण्यास मज्जाव केला आहे. कामगारांच्या मुकादम, टोळी प्रमुखांना काम सोडल्यास कमीशन, अग्रीम रक्कम न देण्याची धमकीच पत्रातून काही कारखान्यांनी दिली आहे.
आरोग्याच्या कुठल्याही सुविधा कारखान्यांनी त्यांना पुरवलेल्या नाहीत. एकावेळी अनेकजण एकत्र येत आज इथे तर उद्या तिथे करीत हे कामगार उसतोडणीचे काम करीत आहेत.
याबाबत पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणतात, ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या, त्यांचा संयम सुटू नये याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी 15 दिवस आहेत एकही साधा शिंकला नाही मग काय चिंता आहे..त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य??.आम्हाला श्रेय ही नको पण निर्णय करा. हा विषय राज्याच्या अधिकारात आहे जे ठणठणीत आहेत ते ही आजारी पडतील. 5 ते 8 हजार लोक एका ठिकाणी आहेत एकदोन ठिकाणी पाऊस पडला त्यांना काही झालं तर कोण जवाबदार ?? टेस्ट करा हवं तर पण तात्काळ म्हणजे आज उद्याच निर्णय व्हावा ..ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर राहतील ..त्यांचे लेकरं आईबाप गावी एकटे आहेत, असे मुंडे यांनी म्हटले आहे.
ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहचवण्यासाठी पंकजा मुंडे मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. ऊसतोड कामगारांबाबत सकारात्मक निर्णय होईल असं सरकारने म्हटलं होते. लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशात विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. त्यांची तपासणी करुन त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजा मुंडे मागील दोन ते तीन आठवड्यांपासून करत आहेत.