शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेच्या एका सदस्याचा तब्बल चार तास फिरूनही उपचार न मिळाल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. यामुळे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला नियोजन जमत नसेल तर सरकार सोडून द्या. पुन्हा फेसबुक लाईव्हमध्ये येऊन गोड गोड बोलू नका, आम्हाला तुम्हाला ऐकण्यात अजितबात रस नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सुनावले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेच्या एका सदस्याचा तब्बल चार तास फिरूनही उपचार न मिळाल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. यामुळे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला नियोजन जमत नसेल तर सरकार सोडून द्या. पुन्हा फेसबुक लाईव्हमध्ये येऊन गोड गोड बोलू नका, आम्हाला तुम्हाला ऐकण्यात अजितबात रस नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सुनावले आहे.
कामगार सेनेच्या निलेश पाटील या पदाधिकाऱ्याने सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त होऊन फेसबुक लाईव्ह केले आहे. यामध्ये इतके हतबल सरकार आपण कधीही पाहिले नव्हते, असे म्हटले आहे. तुम्ही लोकांच्या हॉस्पीटलची व्यवस्था करू शकत नसाल तर टीव्हीवर येऊन दिखावा करू नका. आम्ही आमच्या कुटुंबियांनी सांगितले आहे की घरातच राहा. उपाशी मेलात तरी चालेल परंतु, सरकार हॉस्पीटलची व्यवस्था करत नसल्याने रस्त्यावर मरण्यापेक्षा ते बरे असे म्हटले आहे.
निलेश पाटील यांनी आपल्या एका सहकाऱ्याची धक्कादायक आपबिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितली आहे. जयवंत दळवी नावाचा एक कामगार सदस्य चार दिवसांपासून आजारी होता. आज सकाळी त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे पाटील यांच्यासह दळवी यांचे मित्र, सहकारी आणि कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणत्याही रुग्णालयात त्यांना घेतले गेले नाही. चार तास त्यांना रिक्षात घेऊन फिरत होते.
सगळे प्रयत्न करून झाल्यावरही रुग्णालयात दाखल न झाल्याने उपचाराअभावी दळवी यांचा मृत्यू झाला.
आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याची ही अवस्था असेल तर सामान्य माणसांचे काय होत असेल असा संतप्त सवाल करून पाटील म्हणाले, हा दोष कोणाचा? मुख्यमंत्री साहेब तुम्ही खूप छान बोलता, पण त्याचा रिझल्ट काय मिळतोय? तुम्ही कशाला येऊन सांगता की क्वारंटाईनची व्यवस्था आहे. रुग्णालयांची सोय केली आहे. एखादा रुग्ण चार चार तास फिरूनही त्याला हॉस्पीटल मिळत नसेल तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? सरकार म्हणून तुम्ही खरेच काय करता एकदा प्रॅक्टीकली येऊन बोला. कशाला दिखावा करता? लोकांना स्पष्ट सांगा की आमच्याकडे हॉस्पीटलची व्यवस्था तुटपुंजी आहे.
कोणी माणूस पॉझिटिव्ह आला तर त्याला दाखल करून घेण्यासाठी हॉस्पीटल नाही. कशाला दाखवता सगळ्या गोष्टी. किती गोड गोड ऐकायचे आणि बोलत राहायेचे आणि सहानुभूती घेत राहायचे असा प्रश्न करून पाटील म्हणाले, आम्हाला नकोय तुमची सहानुभूती. तुम्ही खरचे नियोजन करत असाल तर सरकारमध्ये राहा नाहीतर सरकार सोडा. सामान्य माणसाचीअवस्था बिकट झाली आहे. खायला अन्न नाही. काम नसल्याने जयवंत दळवी यांच्यावर कलिंगड विकण्याची वेळ आली होती. कारण सरकारने घर चालविण्यासाठी काहीही केले नाही. त्या बिचाऱ्याला तर काहीतरी करणे भाग होते. कदाचित त्यातच त्याला चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असेल.
अन्यथा चार दिवसांत चालता-बोलता माणूस जाईल कसा? पण आता हे देखील उघड होणार नाही कारण हॉस्पीटलमध्ये घेतलेच नसल्याने त्याचे टेस्टींगच झाले नाही. त्यामुळे रिपोर्ट येणार नाही. आम्ही हतबल होतोय अशी हताशपणे सांगताना पाटील म्हणाले, सामान्यांना घरातच मरायचे आहे तर सरकार हवे कशाला? तुमचे नियोजन चांगले नसेल, तुम्हाला जमत नसेल तर कृपया यापुढे फेसबुक लाईव्हला येऊ नका.
तुम्हाला हात जोडतो तुमचे फेसबुुक लाईव्ह बघायची इच्छा नाही. सामान्य माणसासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही हे सिध्द झाले आहे.
प्रायव्हेट हॉस्पीटल चार-पाच लाख रुपये बिले करत आहेत, आणि तुम्ही एकीकडे सांगता की आम्ही हॉस्पीटलची सेवा मोफत पुरवितो, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. एखाद्या गोष्टीवर तरी ठाम राहा. जर तुम्हाला नाही शक्य होता तर नाही सांगा लोकांना कशाला आश्वासने देता? तुम्ही जर पूर्ण करू शकत नसाल तर यापुढे आम्हाला तुम्हाला ऐकण्यामध्ये रस नाही. आम्ही घरातल्या फॅमिलीला सांगणार बाबांनो हे सरकार जनतेसाठी काही करू शकणार नाही. त्यांचे नियोजन नाही. त्यामुळे जनतेला एक आवाहन आहे की घरात राहा. उपाशी मेलेले चालेल,पण रस्त्यावर मरायला नको. हे सरकार हतबल आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील एक अनुभव सांगताना पाटील म्हणाले, तेथे एक रुग्ण रुग्णवाहिकेत दोन तास होता. परंतु, त्याला रुग्णालयात नेले नाही. त्याला सेवा मिळाली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला