पेरणीच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची महाबीजकडून दरवाढ, शेतकऱ्यांमध्ये संताप
विशेष प्रतिनिधी
मुंबई / बीड : उद्योगक्षेत्र बंद असण्याच्या काळात उद्योजकांना तिप्पट – चौपट रकमेची वीज बिले पाठविणाऱ्या महाआघाडी सरकारने सोयाबीनच्या बियाणे दरवाढ करून शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर दणका दिला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
कोरोनाच्या या महासंकटामध्ये सगळ्याच क्षेत्रांमध्ये मंदीचे वातावरण असताना शेतकऱ्यांना लागणाऱ्या सोयाबीन बियाण्यांची महाबीजने ३० किलोच्या बॅगमागे तब्बल ३६० रुपयांनी वाढ केली आहे. क्विंटल मागे एक हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यामध्ये जवळपास ४० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन शेतीचा मोठा आधार आहे. एकीकडे मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने आधीच शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे. असे असताना आता पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी आहे.
महाबीज हे महामंडळ सरकारच्या आधीन राहून काम करते. मागच्या वर्षीच्या खरीपामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्याचा मोठा परिणाम सोयाबीनच्या प्रतवारीवर झाला. बियाण्यांसाठी वापर केले जाणारे सोयाबीन हे चांगल्या प्रतीचे असते आणि या सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करावी लागत असल्याचे महाबीजकडून सांगण्यात आले आहे.
मागच्या वर्षी महाबीजच्या बियाण्याचा भाव ६२ रुपये किलो होता. यंदा बारा रुपये किलोमागे भाववाढ करण्यात आली आहे. ३० किलो बॅगमागे तब्बल ३६० रुपयांची भाववाढ झाली आहे. तर क्विंटल मागे एक हजार रुपये पेक्षाही जास्तीची भाव वाढ केल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
महाबीज राज्यातील शेतकऱ्याकडून सोयाबीनचे बीजोत्पादन करून घेत असते. मागच्या वर्षी सोयाबीनच्या बीज उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४१६० रुपये भाव मिळाला होता. यावर्षी यात एक हजार रुपयांनी वाढ करून ५१८२ रुपये प्रतिक्विंटल ने महाबीजने शेतकऱ्याकडून सोयाबीनचे बियाणे घेतले आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये सुद्धा दरवाढ करण्यात आली आहे.
राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी हे आपल्याकडील सोयाबीनचा बियाण्यासाठी वापर करतात. मात्र जी खरेदी बाजारातून सोयाबीनच्या बियाण्याची केली जाते त्यात सगळ्यात मोठा वाटा हा महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा आहे. विशेष म्हणजे मान्सून एक आठवड्यावर येऊन ठेपला असतानाही महाबीजकडून त्यांचे दर जाहीर न केल्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या या महासंकट काळामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक तेवढ्या खते व बियाण्यांची उपलब्धता करून देणे हे सरकारचे कर्तव्य असताना पेरणीच्या ऐन तोंडावरच महाबीज महामंडळाकडून सोयाबीन बियाण्यांची झालेली ही वाढ शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटणारी आहे.