- राष्ट्रवादीच्या दबावाखाली झुकली शिवसेना?
- सरकार चालवतंय कोण ठाकरेसाहेब ?
हे राज्य छत्रपती शिवाजी महारांजांच्या आदर्शानुसार चालले, यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल पुण्यातील ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. वाधवान कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यास परवानगी कशी दिली यावरून त्यांनी रोखठोक प्रश्न विचारले आहेत ठाकरे यांना. विशेष म्हणजे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्रीपद ज्या बेकायदा इमारतीमुळे गेले, त्या प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आणण्याचे काम याच कुंभार यांनी केले होते, हे विशेष.
विशेष प्रतिनिधी
पुणे : हे राज्य छत्रपती शिवाजी महारांजांच्या आदर्शानुसार चालले आहे, यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. वाधवान कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यास परवानगी कशी दिली यावरून त्यांनी प्रश्न केले आहेत.
विजय कुंभार यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांना आता अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सगळ्यांनी चांगलं मत व्यक्त केलं होतं. परंतु कदाचित इथून पुढे त्यांना अनेक कठीण प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. लॉकडाउनच्या काळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपी वाधवान यांना खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्यासाठी देण्यात आलेली परवानगी केवळ वादाच्या भोव-यात सापडणार नाही, तर सरकारातील काही जणांची विकेटही यात जाण्याची शक्यता आहे. आणि अनेक प्रश्नांची उत्तरे देताना शासनाची भंबेरी उडणार आहे यात शंका नाही.
यासंदर्भात खालील प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळणे आवश्यक आहे, असे कुंभार यांनी म्हटले आहे. ती म्हणजे –
- वाधवान मंडळींनी खंडाळ्यावरून महाबळेश्वर ला जाण्यासाठी परवानगी कशी मागितली? (म्हणजे ई-मेल द्वारे पत्र देऊन ) आणि ती कशी देण्यात आली?
- महाबळेश्वरला जाण्यासाठी या मंडळींनी कोणते कारण दिले होते?
- हे पत्र कुणाला उद्देशून गेले होते ?.
- अशी परवानगी देण्यासाठी काय निकष आहेत?
- अशी परवानगी देण्यासाठी कुणी शिफारस केली होती का? असल्यास कुणी?
- या पत्रावर कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी काय काय कार्यवाही केली ? कुणाकुणाचा अभिप्राय घेतला ?
- ज्या लोकांना महाबळेश्वरला जायचं आहे त्यांची ओळख पटवण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे घेतली ?
- ही कागदपत्रे कुणी प्रमाणित केली.?
- अशी परवानगी कोणत्या कायद्याच्या कोणत्या नियमान्वये देण्यात आली ?
- अशी परवानगी देण्याचे अधिकार कुणाकुणाला आहे?
- अशीच परवानगी आणखी लॉकडाउनच्या काळात किती लोकांना देण्यात आली?
- खंडाळा ते महाबळेश्वर या रस्त्यावर किती ठिकाणी वाधवान मंडळींना अडविण्यात आले व त्यांची तपासणी करण्यात आली?
- जिथे जिथे वाधवान मंडळींना अडवण्यात आले असेत तिथे त्यांच्याकडील परवान्याची वैधता संबधितांनी कशी तपासली?
- प्रत्येक गाडीत ५ लोक असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा भंग झाला असल्याने त्यांना का अडवण्यात आले नाही.
कपिल वाधवान यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.असं असतानाही ९ वाधवानांसह त्यांच्या १४ नोकर लोकांना आपण व्यक्तीश: ओळखतो ते आपले कौटुंबिक मित्र आहेत असं ज्यावेळी एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणतो त्यावेळेस ते फार घातक असते. ज्या ५ गाड्यांमधून वाधवान कुटुंबियांनी प्रवास केला त्या गाड्या मुंबईतील बांधकाम व्यावसायिक कंपन्याच्या आहेत.
ULTRA SPACE DEVELOPERS, RKW CONSTRUCTION FACILITY , GOLDEN BEACH INFRACON या त्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांचे मुंबईत काही बांधकाम प्रकल्प सुरू आहेत.या कंपन्यांवरही शेकडो कोटी रुपयांची कर्जं आहेत. या कंपन्यांच्या संचालकांनी वाधवान मंडळींना मदत का केली ? हेही जनतेसमोर येण्याची गरज आहे.
वाधवान कुटुंबियांना आणि त्यांच्या नोकरांना महाबळेश्वरला जाण्यासाठी देण्यात आलेल्या परवान्यामध्ये ज्या व्यक्तींची नावे आहेत ,त्यातील कुणाचेही ओळखपत्र किंवा ओळख पटेल अशी कोणतीही खूण घेण्यात आलेली नाही. आणि तशी ओळख विचारण्याचे कुणी प्रयत्नही केल्याचे दिसत नाही. त्यामुळे या गाड्यांमधून खरंच कोण कोण आणि कुठे गेलं यावर संशय घ्यावा अशी परिस्थिती आहे. वाधवान यांची सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून कारवाई चालू आहे ही बाब महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती नव्हती ज्याच्यावर विश्वास ठेवता येणे कठीण आहे. गुन्हेगार, शासकीय अधिका-यांचे आणि राजकारण्यांचे हे साटलोटं धक्कादायक आणि धोकादायकही आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सतत उदो उदो करणारे आता छत्रपतींचा आदर्श ठेवणार की जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणार हे या प्रकरणावरील कारवाईतून लक्षात येईल. लॉकडाउनमूळे राज्यात आणि देशात सामान्य नागरिकांना अनेक हाल अपेष्टांना सामोरं जावं लागत आहे. हातावरचे पोट असलेल्या अनेकांनी अंगावरील वस्त्रानिशी घर सोडाव लागलं, अनेकंना उपाशीपोटी रहावं लागत आहे.संचारबंदीमूळे कोणतेही वाहन न मिळालेल्या आणि आपल्या घराकडे चालत निघालेल्या अनेकांना रस्त्यातच आपले प्राण गमवावे लागले. शेतातील आपल्या आईवडीलांना जेवणाचा डबा घेऊन जाणा-या मुलासह अनेकांना पोलिसांनी बडवले. तरीही व्यापक जनहित पाहून जनतेने पोलिसांच्या कारवाईचे समर्थनच केले. अशा स्थितीत जेंव्हा काही गुन्हेगार शासनाला वेठीस धरून मौजमजा करण्यासाठी सर्व यंत्रणा वेठीस धरतात आणि या यंत्रणाही त्यांचे गुलाम असल्यासारखं वागतात. तेंव्हा हे राज्य छत्रपती शिवाजी महारांजांच्या आदर्शानुसार चालले आहे. यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा.
कुंभार यांच्या या प्रश्नांमुळे महाआघाडी सरकारमधील मंत्री कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात, तीन पक्षांनी मिळून बनलेले हे सरकार नेमके चालवते तरी कोण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की दुसरे कोणी असे अनेक प्रश्न नेटकरी विचारू लागले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावर अद्यापतरी सोईस्कर मौन पाळले आहे.