विशेष प्रतिनिधी
लखनौ : कोरोना बाबत चीनच्या लपवाछपवीनंतर त्या देशातून बाहेर पडण्याची तयारी जपान, अमेरिका, कोरियाच्या कंपन्यांनी वेगाने सुरू केली असून या कंपन्या भारताकडे सुरक्षित देश म्हणून पाहात आहेत.
त्यातही कोरियातील आयटी आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी भारतात विशेषत: उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यात रस दाखविला आहे. कोरियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या हवाल्याने उत्तर प्रदेशचे उद्योगमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी ही माहिती दिली.
कोरियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या सुमारे १ लाख ८० हजार कंपन्या सदस्य आहेत. त्यांच्या बहुसंख्य उत्पादन शाखा चीनमध्ये आहेत. या शाखा बंद करून बाहेर पडण्याची त्यांनी तयारी चालविली आहे.
उत्तर प्रदेशात या कंपन्याची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. मंत्री आणि अधिकाऱ्यांची समिती त्यासाठी गठित करण्यात आली आहे. ही समिती चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्याशी वाटाघाटी करते आहे. यातून राज्यात मोठ्या गुंतवणुकीस चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्यात विशिष्ट कालावधीत १५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.