वृत्तसंस्था
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर झालेल्या अभियंता मारहाण प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी ढिसाळपणा करु नये. महाराष्ट्राला अस्वस्थ करणाऱ्या या घटनेचा निष्पक्ष आणि जलद तपास झाला पाहिजे, अशी मागणी हिंदू विधीज्ञ परिषदेने केली आहे.
ठाणे येथील ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे कार्यकर्ते असलेल्या अभियंता अनंत करमुसे यांना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बळजबरीने नेऊन अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेदम मारहाण होत असताना आव्हाड तिथे उपस्थित होते. आव्हाडांचे अंगरक्षक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणी मारहाण केली, असा आरोप आहे.
हिंदू विधीज्ञ परिषदेने म्हटले आहे – आव्हाड यांनी ‘ही घटना घडली तेव्हा मी सोलापूर येथे दौर्यावर होतो’, ‘हा युवक माझ्याविषयी 3 वर्षांपासून पोस्ट करत होता’, ‘या संदर्भात काय झाले आहे, ते मला माहीत नाही’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच ‘तुमचा दाभोळकर करू’, अशी धमकी मिळाल्याची तक्रार आव्हाड यांनी केली आहे, असे कळते. हे वृत्त खरे किंवा खोटे आहे, याचा तपास करणे आवश्यक आहे. एकूणच महाराष्ट्र अस्वस्थ करणार्या या घटनांचा निष्पक्ष आणि शीघ्रतेने तपास झाला पाहिजे; मात्र केवळ मंत्री आहेत, म्हणून पोलिसांनी या प्रकरणी तपासात ढिसाळपणा करू नये.
परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकप्रतिनिधींच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालये सुरू झालेली आहेत. त्यामुळे सदर प्रकरण तपासानंतर अशा विशेष जलदगती न्यायालयासमोर जाणे आवश्यक आहे. आझाद मैदान दंगलीतील दंगलखोरांना अजून शिक्षा झालेली नाही. तसे या प्रकरणात होऊ नये. या घटनेकडे आणि निवाड्याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग असलेल्या प्रकरणांमध्ये तपास जाणीवपूर्वक ढिसाळपणे केला जातो, असा आतापर्यंत अनुभव आहे. या प्रकरणात आरोपी मंत्रीच असल्याने तपास निष्पक्षपणे केला जाईल कि नाही, अशी सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे.
इचलकरंजीकर यांनी गुन्ह्याच्या तपासाविषयी काही सूचना केल्या आहेत. करमुसे यांच्या सोसायटी अथवा आजूबाजूच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांतील फुटेज तपासावे, कोणत्या गाड्यांतून त्यांना नेले, त्या गाड्यांनी लॉकडाऊन चालू असतांना कोणाची अनुमती घेतली होती, मंत्रीमहोदयांच्या बंगल्याबाहेरील, तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेर्यांतील फुटेज तपासावे, त्यांच्याकडे येणार्या प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनाची नोंद तपासावी. मंत्री जितेंद्र आव्हाड, त्यासह त्यांच्या बंगल्यातील त्या वेळी उपस्थित पोलीस, नोकर-चाकर, कार्यकर्ते, पोलीस, तसेच तक्रारदार करमुसे आणि त्यांच्या पत्नी या सर्वांचे कॉल रेकॉर्ड अन् मोबाइलची लोकेशन तपासावी, मंत्री आव्हाड ज्या भागात प्रवास करत होते, त्या भागातील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या पावत्या तपासाव्यात, करमुसे यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करावा, पोलिसांची कोणती गाडी करमुसे यांना घेऊन गेली, काय सांगून घेऊन गेली, त्याच्या स्टेशन डायरीमध्ये काय नोंदी केल्या, या सर्व गोष्टी तपासणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणी सर्व जबाब न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर नोंदवावेत, आदी मागण्या इचलकरंजीकर यांनी केल्या आहेत.