देशातील आर्थिक चक्र हळुहळू गती घेऊ लागली असून इंधनाच्या मागणीत ६५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वाहतूक, विमान सेवा पूर्ण बंद होती तर रेल्वेसेवाही बाधीत झाली आहे. पुढच्या महिन्यापर्यंत इंधनाची मागणी लॉकडाऊन पुर्वी होती तितकी होण्याचा अंदाज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील आर्थिक चक्र सुरू झाले असून सध्या इंधनाच्या मागणीत ६५ टक्के वाढ झाली आहे. पुढील महिन्यापर्यंत चीनी व्हायरसपूर्व काळात होती तितकी मागणी पूर्ववत होईल, असा अंदाज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे.
चीनी व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक व्यवहार बंद होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक चक्र सुरू होण्यास सुरूवात झाली आहे. प्रधान यांनी सांगितले की, २५ मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. त्यावेळी इंधनाच्या मागणी ३० ते ३५ टक्के घट झाली होती.
तरीही प्रमुख उत्पादन क्षमता असलेले कारखाने सुरू होते. आता ही मागणी वाढली आहे. जून महिन्यापर्यंत पूर्णपणे मागणी वाढून चीनी व्हायरसपूर्व काळाइतकी होईल. प्रधान यांनी सांगितले की पेट्रोलची मागणी प्रामुख्याने वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले जात असल्याने आता दुचाकीवरील प्रवास वाढणार आहे.
त्याचबरोबर छोट्या मोटारींचा वापरही वाढणार आहे. त्यामुळे पेट्रोलची मागणी सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर महामार्गावरील वाहतूक, रेल्वे सेवा आणि कृषि क्षेत्रातील व्यवहार वाढत असल्याने डिझेलची मागणीही वाढणार आहे. २५ मे पासून विमान वाहतूक सुरू होणार आहे.