वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोविड-19 संसगार्मुळे देशात सुरु असलेल्या संपूर्ण बंदीच्या काळात ज्या विमाधारकांच्या आरोग्य तसेच वाहन विम्याचे (थर्ड पार्टी-त्रयस्थ भागीदार) नूतनीकरण आवश्यक आहे अशा विमा पॉलिसींचा हप्ता आता विमाधारक १५ मे पर्यंत भरू शकणार आहेत. त्यांना ही परवानगी देणारी अधिसूचना केंद्र सरकारने नुकतीच जारी केली.
या निर्णयामुळे विमाधारकांचे विमा संरक्षण पॉलिसींचा हप्ता भरण्याच्या वाढीव कालावधीत देखील अखंडितपणे सुरु राहील तसेच या कालावधीत येणारे विम्याचे दावे कुठल्याही अडचणीविना सुलभतेने विमाधारकांना मिळू शकतील.
ज्या विमाधारकांच्या आरोग्य विम्याचे हप्ता किंवा वाहनाच्या विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी भरण्याचा हप्ता देशात संपूर्ण संचारबंदी लागू असताना, म्हणजेच 25 मार्च ते 3 मे या कालावधीत भरणे आवश्यक आहे.
मात्र संचारबंदीमध्ये लागू झालेल्या निबंर्धामुळे ज्यांना हा हप्ता वेळेत भरणे शक्य झाले नाही किंवा होणार नाही त्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. हे विमाधारक त्यांच्या विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी 15 मे या दिवशी किंवा त्यापूर्वी कधीही हा हप्ता भरू शकतील. यामुळे वाहनधारकांना या मुदतीत वैधानिक मोटार वाहनाच्या (त्रयस्थ भागीदार) विमा संरक्षणाचा विना खंड लाभ घेता येईल आणि या कालावधीत कोणताही वैध दावा केला तर तो मंजूर होऊन त्याची रक्कम देखील सुलभतेने मिळू शकेल.