विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनी व्हायरस कोरोनाचा फैलाव अल्पसंख्याक समाजात अधिक होतोय. त्या समाजात मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. ते रोखण्यासाठी आणि अल्पसंख्याक समाजात जनजागृती करण्यासाठी उर्दू भाषेतून संदेश देण्याचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे.
या उपक्रमासाठी मौलानांची मदत घेण्यात येत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू होण्याचे प्रमाण अल्पसंख्याक समाजात ४४% आहे. हे अन्य लोकसंख्येच्या तुलनेत जास्त आहे. हे लक्षात घेऊन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने कोरोना हॉटस्पॉट मध्ये स्थानिक धार्मिक नेत्यांची मदत घेऊन जनजागृती करण्यासाठी उर्दू भाषेतून संदेश पोहोचविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातून कोरोना विषयक जागृती झाली तर प्रादूर्भाव रोखून हॉटस्पॉटची संख्या कमी करता येईल, असे महाराष्ट्र सरकारचे मत आहे.
१७ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत कोरोनामुळे १८७ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ८९ जण अल्पसंख्याक समूदायाचे होते, तर १५ एप्रिल ते ३ मे या कालावधीत ३६१ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी १५० जण अल्पसंख्याक समूदायाचे होते. मृत्यूचे हे प्रमाण अन्य लोकसंख्येच्या तुलनेत ४४% होते.
राज्य सरकारचे अधिकारी आणि एक्सपर्टनी याची काही कारणेही शोधली आहेत. आखाती देशांमधून भारतात येण्यास मार्चच्या मध्यानंतर प्रतिबंध घालण्यात आला. तोपर्यंत शेकडो नागरिक भारतात पोहोचले होते. २० मार्च पर्यंत मशिदींमध्ये सामूदायिक नमाज पठण सुरू होते. शिवाय अल्पसंख्याक समाज अनेक ठिकाणी दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहतो. तेथे सोशल डिस्टंसिंग पाळणे अशक्य असते. आरोग्य सेवाही फारशा उपलब्ध नसतात. त्यातून या समाजात कोरोनाचा फैलाव अधिक झाला असे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आखाती देशातून आलेल्या नागरिकांचे सुरवातीला स्क्रिनिंग होऊ शकले नाही. तशा सूचना त्यावेळी नव्हत्या. त्यातून अल्पसंख्याक समूदायात कोरोनाचा फैलाव सुरू झाला. नंतर त्याचा वेग वाढला, असे महाराष्ट्राचे साथ रोग नियंत्रक प्रदीप आवटे यांनी सांगितले.
तबलिगी जमातीच्या लोकांचा महाराष्ट्रातला वावर मर्यादित होता. निजामुद्दीनच्या मरकजमध्ये जाऊन आलेले ८९ तबलिगी महाराष्ट्रात आढळले, असे आवटे यांनी सांगितले. तर तबलिगी जमातीसंबंधीच्या मीडिया रिपोर्टिंगमुळे अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे अनेकांनी वैद्यकीय सल्ला घेण्याचे टाळले आणि मृत्यूचे प्रमाण वाढले, असे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समूदायाचे स्थानिक नेते आता जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. लक्षणे आढळली तर लपवून ठेवण्याएेवजी रिपोर्टिंग करायला सांगत आहेत. त्यातून जनजागृती झाली तर येत्या काही दिवसांमध्ये परिस्थितीत सुधारणा होईल, असे आवटे यांनी सांगितले.