वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांच्यावर भडकाऊ वक्तव्याबद्दल दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
“भारतीय मुस्लिमांचा अशाच प्रकारे छळ होत राहिला तर भारतीय मुस्लिम अरब देशांकडे तक्रार करतील आणि मग भारतावर नरकअवस्था ओढवेल,” अशा आशयाची आक्षेपार्ह पोस्ट खान यांनी सोशल मीडियात व्हायरल केली होती.
खान यांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्याविरोधात 30 एप्रिलला तक्रार दाखल करण्यात आली. खान यांच्याविरोधात आयपीसी कलम 124 ए (देशद्रोह) आणि 153 ए (गुन्हे, धर्म, वंश, जन्मस्थान, वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढविणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतल्या वसंत कुंज येथे राहणाऱ्या व्यक्तीने खान यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारदाराने म्हटले आहे की, खान यांनी सोशल मीडियातल्या पोस्टमध्ये व्यक्त केलेली मते आणि माहिती यामागे “लोकांना भडकवण्याचा आणि समाजात कलह निर्माण करण्याचा हेतू दिसतो.” या एफआयआरची प्रत आपल्याकडे असल्यचा दावा झी न्यूज या वृत्तवाहिनीने केला असून या एफआयआरच्या प्रतीचा काही भाग त्यांनी जाहीर केला आहे.
पोस्ट पुरेशी व्हायरल झाल्यानंतर खान यांनी त्यांना उपरती झाल्याचा दावा केला. त्यांनी १ मे रोजी आपल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल दिलगिरी व्यक्त केली. चीनी विषाणूच्या वैद्यकीय संकटाला देश सामोरे जात असल्याच्या या काळात माझी पोस्ट दुर्दैवी आणि असंवेदनशील होती, असे खान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खान यांनी 20 जुलै 2017 ला दिल्लीच्या अल्पसंख्याक आयोगाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांची मुदत तीन वर्षांची असून आणखी तीन महिन्यांचा त्यांचा कार्यकाल शिल्लक आहे.